
दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघाताची घटना गुजरातमधील जुनागढमध्ये घडली. या अपघातात परिक्षेसाठी चाललेल्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जुनागड-वेरावळ महामार्गावर सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली.
भांदुरी गावाजवळ अपघातग्रस्त कारपैकी एक कार अज्ञात कारणामुळे रस्त्याच्या कडेला उलटली आणि भरधाव वेगात दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेला गेली. यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला पहिली कार धडकली, असे पोलीस उपअधीक्षक दिनेश कोडियातर यांनी सांगितले.
या अपघातात दोन्ही कारमधील सातही प्रवासी जागीच ठार झाले. एका कारमध्ये चार विद्यार्थ्यांसह पाच जण होते. तर दुसऱ्या कारमध्ये दोन जण होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.