
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2264 घरांच्या लॉटरीला अल्प प्रतिसादामुळे 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुकांना आता 24 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच यशस्वी अर्जांची संगणकीय सोडत नववर्षात म्हणजे 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या इमारतीत होणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 11 ऑक्टोबरला 2264 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती. यात 20 टक्के सर्वसमावेशक योजने अंतर्गत 594, 15 टक्के योजनेतील 825, मागील सोडतीतील व इतर विखुरलेली 728 घरांसह रोहा, रायगड व ओरस सिंधुदुर्ग येथील 117 भूखंडांचा समावेश आहे. या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आधी 10 डिसेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत तर अनामत रक्कम भरण्याची मुदत 11 डिसेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत होती.
2264 घरांसाठी आतापर्यंत जेमतेम 5 हजार अर्ज आले आहेत. अर्जदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे कोकण मंडळातर्फे आता अर्जविक्री आणि स्विकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असे आहे नवीन वेळापत्रक
- ऑनलाईन अर्ज सादर करणे – 24 डिसेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत
- ऑनलाईन अनामत रक्कम भरणे – 26 डिसेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत
- स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी – 8 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता
- ऑनलाईन हरकती – दावे दाखल करणे – 10 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- पात्र अर्जदारांची अंतिम यादी – 16 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता
- यशस्वी अर्जाची सोडत – 21 जानेवारीला सकाळी 10 वाजता