देशभरातील महत्वाच्या घडामोडी

16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 ते 21 डिसेंबर या काळात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज याची घोषणा केली. विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाचे आज सूप वाजले. त्यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा केली. दरम्यान, अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात असून 12 डिसेंबरपासून संपूर्ण सचिवालय मुंबईतून नागपूरमध्ये दाखल होईल.

उद्योगपती रतन टाटा यांना विधिमंडळात श्रद्धांजली

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी तर विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्यासह विधिमंडळाच्या दिवंगत सदस्यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. विधानसभेत माजी सदस्य मधुकर पिचड, रोहिदास पाटील, बाबा सिद्दिकी, लोकसभा सदस्य व माजी विधानसभा सदस्य वसंतराव चव्हाण, माजी ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती उगले, रामकृष्ण पाटील, सीताराम दळवी, विजय साळवी व हरिश्चंद्र चव्हाण यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव सादर करण्यात आला.

मोफत दिव्यांग शिबीर

भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्यावतीने राज्यस्तरीय दिव्यांग शिबीर पुण्यात खराडी येथील ढोले-पाटील कॉलेज येथे 16 डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे. सरसंघसंचालक मोहन भागवत या उपक्रमाला उपस्थित राहणार आहेत. देशातील 13 विकलांग केंद्रांपैकी एक केंद्र पुण्यात कार्यरत असून कायमस्वरूपी असलेले हे केंद्र गेल्या 25 वर्षांपासून अखंड कार्यरत आहे. गेल्या 5 वर्षांपासून परंपरागत जयपूर फूटऐवजी 50 हजार रुपयांचा अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर मोफत बसवण्यात येतात. केंद्रातील वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षित तज्ञांद्वारे सर्व कृत्रिम अवयव बनवले जातात. पाय बसवल्यानंतर अपंग व्यक्ती चालणे, पळणे, पोहोणे, उडी मारणे, वाहन चालवणे ही दैनंदिन कामे करू शकतात. त्याबाबत केंद्रावर तज्ञांमार्फत सराव, मार्गदर्शनही केले जाते. दिव्यांगांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी या 9175558356 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाकिस्तानी घुसखोर ठार

पंजाबच्या अमृतसर जिह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी संशयित पाकिस्तानच्या घुसखोराला ठार केले. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा फायदा घेत तो हिंदुस्थानच्या हद्दीत शिरल्यानंतर संशयास्पद हालचाली पाहून बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. त्यात तो ठार झाला. मात्र, अद्याप पाकिस्तानने मृतदेह परत करण्याची मागणी केलेली नाही. अमृतसरच्या सीमेजवळ असलेल्या महावा गावाजवळ ही घटना घडली. रात्री जवान गस्त घालत असताना त्यांना घुसखोराची चाहूल लागली, अशी माहिती बीएसएफने दिली. जवानांची नजर पडताच घुसखोराने लपण्याचा प्रयत्न केला. मग जवानांनी त्याला थांबण्याची सूचना केली. पण, त्याने दुर्लक्ष करत पुढे येण्याचा प्रयत्न केला. संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने जवानांनी गोळीबार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.