परभणीत माथेफिरूकडून संविधानाची विटंबना, संतप्त जमावाचा रास्ता रोको

परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको करत रेलवाहतूक रोखून धरली तर काही गाड्यांवर दगडफेक केली. दरम्यान, प्रतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. दत्ता सोपान पवार असे माथेफिरूचे नाव आहे.

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरूने आज सायंकाळी साडेपाच वाजता त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले. मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले. प्रचंड घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर संतप्त अनुयायांनी उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली. तसेच परभणी रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेसदेखील रोखली.