देशातील 18 कोटी 74 लाख शेतकरी कर्जबाजारी

देशातील तब्बल 18 कोटी 74 लाख शेतकऱ्यांवर कृषी कर्ज असल्याची माहिती सरकारने संसदेत दिली. ही 31 मार्चपर्यंतची आकडेवारी असून, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या यादीत तामिळनाडू अव्वल आहे. तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात कर्जबाजारी शेतकऱ्याची आकडेवारी सादर करताना देशातील सर्व 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शेतकऱ्यांची कृषी कर्ज असलेली बँक खाती असल्याचे स्पष्ट केले.

तामिळनाडूत सर्वाधिक 2.88 कोटी शेतकरी कर्जबाजारी आहेत, तर उत्तर प्रदेशात 1.88 कोटी आणि कर्नाटकमध्ये 1.62 कोटी कर्जबाजारी शेतकरी आहेत. केंद्र सरकारने 2019 ते 2024 दरम्यान कोणतीही शेतकरी कर्जमाफी केलेली नाही. काही राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यात कर्जमाफी योजना लागू केल्या आहेत. याव्यतिरिक्त कोणत्याही राज्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अतिरिक्त निधीची विनंती केली नाही, असे ठाकूर यांनी सांगितले.