
>> रविप्रकाश कुलकर्णी
ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक जत्रा या गोष्टी आता नवीन राहिलेल्या नाहीत. पण एक प्रदर्शन या सर्वांपेक्षा वेगळं असतं आणि म्हणूनच शक्यतो मी त्याला भेट देतो. हे प्रदर्शन म्हणजे 6 डिसेंबरला डा. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर भरलेला ग्रंथमेळा!
या 6 डिसेंबरची मला आठवण करून द्यायला लागत नाही. गाडीमध्ये नेहमीच्या चेहऱयामोहऱयाची न दिसणारी, कपड्यासकट आणि कच्चा-बच्चासह वेगळी दिसणारी ही माणसे वेगळी आहेत हे उठून दिसतात. या सगळ्यांना दादरला जायचे असते. अर्थात आधी चैत्यभूमीकडे आणि नंतर बाबासाहेबांचे निवासस्थान राजगृहाकडे.
बाबासाहेब आंबेडकर (जन्म 14 एप्रिल 1891 – मृत्यू 6 डिसेंबर 1956) अवघ्या 66 वर्षांच्या आयुष्यात या महामानवाने प्रज्ञेची जी झेप घेतली आहे, ती स्तिमित करणारी आहे. साताऱयाच्या म्युन्सिपल हायस्कूलमध्ये शिकलेला मुलगा भारतीय घटनेचे शिल्पकार एवढय़ा मोठ्या पल्ल्याची हनुमान उडी घेतो, हे काम चमत्कार वाटावे इतके अद्भुत आहे. त्याच्या खाणाखुणा त्यांनी लिहिलेल्या साहित्यात आणि चरित्र ग्रंथात दिसतात. त्याचबरोबर त्यांचे अतिशय महत्त्वाचे काम म्हणजे समाजातील पददलितांना त्यांच्या अस्तित्वाची आणि माणूसपणाची जाण देऊन त्यांची अस्मिता जागवली. या ठिणगीतूनच सृजनाचे अंकुर फुटले आणि त्यातूनच आंबेडकरी साहित्य चळवळ सुरू झाली व नवनवे लेखक आपला आत्मानुभव प्रकट करू लागले. ही एक निळी पहाट होती. ज्यातून दलित वाङ्मय हा स्वतंत्र प्रकार सुरू झाला.
या सर्व गोष्टींचे कमी-जास्त पडसाद आणि क्षणचित्र महापरिनिर्वाण निमित्ताने शिवाजी पार्कवर होणाऱया कार्यक्रमात दिसू लागले. त्यातलाच एक भाग म्हणजे ग्रंथ प्रदर्शन. याचे विशेष म्हणजे इथे प्रामुख्याने ठसठशीतपणे दलित वाङ्मयच असते. एरवी क्वचितच माहीत असलेली दलित साहित्यातील वेगवेगळी पुस्तके इथे पाहायला मिळतात. तसेच त्याचे प्रकाशकही आणि अर्थात लेखकही. मला आठवते, बाबुराव बागुल ‘आपले आम्ही’ नावाचे नियतकालिक कटाक्षाने विकायला इथे स्वत उभे राहत असत.
या ग्रंथ दालनात आंबेडकर साहित्याचं वर्चस्व असते. त्याच्या जोडीला पेन, की-चेन, लॉकेट्स अशा वस्तू असतात त्यावर कटाक्षाने बाबासाहेबांचा फोटो असतो. तिथे पाणी हक्क समितीचा एक स्टॉल होता. तिथे वेगवेगळी चित्र असलेले चहाचे मग होते, पण मागणी होती ती बाबासाहेबांचा फोटो असलेल्या मगला. या स्टॉलवर काही फोटो असलेल्या फ्रेम होत्या. त्यात एक फ्रेम होती अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोची. हा फोटो आजपर्यंत कधी कुठे छापलेला आठवत नाही. नंतर घेऊ या म्हणून पुढे सरकलो आणि परतताना तो स्टॉलच सापडला नाही. तशी माहिती देणारी येथे यंत्रणाच नव्हती. असेच अण्णाभाऊंचे एक छोटेखानी पुस्तक दिसले ‘मांग बांधवांना पत्र!’ समग्र अण्णाभाऊ साठे वाङ्मयातदेखील याची नोंद दिसत नाही. या मांडवात बाबासाहेबांचा फोटो असलेली वेगवेगळी कॅलेंडर होती. ही पन्नासएक प्रकारची, तीसुद्धा बाबासाहेब आंबेडकर चित्रांची पाहिल्यावर लक्षात आले. या कॅलेंडरचे जगदेखील केवढे मोठे आहे. टी-शर्टदेखील दिसले. त्यावर बाबासाहेबांचा फोटो होता, पण त्यापैकी एकावर बी. आर. आंबेडकर अशी इंग्रजी स्वाक्षरीदेखील होती. मग सहज मनात आलं देवनागरी स्वाक्षरी असलेला टी-शर्ट का नव्हता? उलट एक-दोन मराठी पुस्तके होती त्यावरदेखील ग्रंथकाराचे नाव म्हणून डॉ. बी. आर. आंबेडकर असे छापलेले दिसले.
फेरफटका मारत असताना एका स्टॉलवर एक दिवाळी अंक दिसला त्यावर चक्क व्हॅन गॉगचे चित्र होते. कुतूहलाने अंक बघितला. त्याचे नाव होते ‘केतकी.’ केतकी प्रकाशनाचा हा स्टॉल होता. तिथेच कळले रमाकांत जाधव यांच्या ‘सोनबा’ कादंबरीच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन आहे. सोनबा येवले या माणसाची बाबासाहेबांवर किती निष्ठा होती आणि त्यासाठी त्याने काय ध्यास घेतला याची विलक्षण करूण कहाणी जाधव यांनी विलक्षण ताकदीने लिहिलेली आहे. श्री. ना. पेंडसे यांच्यासारख्या चोखंदळ कादंबरीकाराने त्याला दाद दिली आहे. “बिचारा सोनबा विस्मृतीत गेलेला. तुम्ही ग्रंथरूपाने त्याला जिवंत केलं. तुम्हाला निरंतर आंतरिक समाधान वाटावं असं लेखन तुमच्या हातून झालं आहे. पाण्याचा घडा घेऊन पनवेलला ज्या नाक्यावर सोनबा डॉक्टरांची वाट पाहात होता तिथे स्तंभासारखं काही उभारणं शक्य आहे का? विचार करा. त्याकरिता देणग्या जमवणार असाल तर माझं नाव गृहीत धरा.’’
या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने हे सोनबा नावाचा सोनं पुन्हा एकदा लक्षात आले. आंबेडकरी ग्रंथोत्सवात जाण्याचे सार्थक अशा वेगळ्या वाटांची पुस्तके कळण्यासाठीसुद्धा आहे.