
कर्नाक पुलाचा दक्षिण बाजूचा लोखंडी गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले असून आता दुसऱ्या बाजूचा लोखंडी गर्डर बसवला जाणार आहे. या दुसऱ्या गर्डरसाठी लागणारे 83 टक्के साहित्य प्रकल्पस्थळी आणले गेले आहे. हा दुसरा गर्डर बसवण्याचे काम जानेवारीत पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, कर्नाक पूल जून महिन्यापासून वाहतुकीला खुला करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळच्या 154 वर्षे जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महापालिकेकडून पुनर्बांधणी सुरू असून दक्षिण बाजूचा लोखंडी गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले असून आता दुसऱया बाजूचा लोखंडी गर्डर बसवण्याचे काम सुरू केले जाणार आहे. या दुसऱया गर्डरसाठी लागणारे 428 मेट्रिक टन (83 टक्के) सुटे भाग प्रकल्पस्थळावर आणले गेले आहेत. उर्वरित सुटे भाग 20 डिसेंबरपर्यंत प्रकल्पस्थळी आणले जाणार आहेत. गर्डरच्या सुटय़ा भागांचे जोडकाम, गर्डर स्थापित करण्याची कार्यवाही, पोहोचमार्ग (अॅप्रोच रोड) बांधणी, भार चाचणी (लोड टेस्ट) इत्यादी कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्यास 5 जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीला खुला केला जाईल, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.