
महायुती सरकारची वक्रदृष्टी आता मराठी शाळांवर पडली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मराठी शाळा काही कारण दाखवून बंद करायच्या आणि जागा बळकवायची असा महायुतीचा अजेंडा आहे. चांदिवलीतील महानगरपालिकेच्या मराठी शाळेची भिंत पडली म्हणून शाळेला नोटीस पाठवून दुसऱ्या शाळेत मुलांना स्थलांतरित करा, असा थेट आदेश देण्यात आलाय. मात्र विकासकांच्या फायद्यासाठी मराठी शाळा बंद पडू देणार नाही! असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
चांदिवलीतील महानगरपालिकेच्या मराठी शाळेची एक भिंत पडली म्हणून शाळा बंद करा अशी नोटीस शाळेला पाठवण्यात आली आहे. खरंतर शाळेच्या बाजूला रस्त्याचे काम असताना जेसीबीची धडक लागल्याने भिंत कोसळली. तेच निमित्त साधून दोन किलोमीटर लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱया शाळेत मुलांना स्थलांतरित करा, असा थेट आदेश देण्यात आला आहे. त्यावरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. मुळात एक भिंत पडल्यावर संपूर्ण शाळा कशी काय बंद करू शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या शाळेतील कित्येक गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले आहे. कुण्या विकासकांसाठी आम्ही मराठी शाळा बंद पडू देणार नाही! ही मराठी शाळा वाचलीच पाहिजे! असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
पालक आक्रमक
शाळा वाचवण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. आजही मुलांसह पालकांनी संतप्त निदर्शने केली. शाळेचे काही शिक्षकही मुलांच्या बाजूने उभे ठाकले आहेत. मुलांना संघर्षनगरच्या शाळेत किंवा हॉस्पिटलात पाठवा असे सांगितले जाते. चार दिवसांपासून आमची मुलं शाळेत गेलेली नाहीत. त्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे, असे पालक म्हणाले.