दारुड्या ट्रेलर चालकाने पोलीस व्हॅनसह 50 गाड्यांना चिरडले, अंबरनाथ रोडवर थरकाप

कटाई-कर्जत महामार्गावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका दारुड्या ट्रेलरचालकाने बेदरकारपणे विरुद्ध दिशेने वाहन चालवत पोलीस व्हॅनसह 50 वाहनांना चिरडले. या अपघातात कार, दुचाकी, रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुजराज कुमार (24) असे माथेफिरू ट्रेलरचालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ट्रेलरचालक गुजराज कुमार हा मूळचा पंजाबचा असून तो आज सकाळी नेवाळी नाका येथून बदलापूरच्या दिशेने निघाला. त्यावेळी त्याने एका वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर त्याने ट्रेलर विरुद्ध दिशेने चालवत पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या चालकाने पालेगाव, अंबरनाथ, आनंदनगर पोलीस चौकी, वैभव हॉटेल चौक, सुदामा हॉटेल चौक मार्गिकेवर उलट्या दिशेने भरधाव वेगाने ट्रेलर चालवत समोरून येणाऱ्या कार, दुचाकी, रिक्षांना धडक दिली. सुसाट निघालेला ट्रेलर हा एमआयडीसी परिसरात एका कंटेनरला जाऊन धडकला. त्यानंतर पोलिसांनी ट्रेलरचालकाच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले 

कर्जत-काटई मार्गावर सुरू असलेल्या या चित्तथरारक घटनेबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी व्हॅनच्या मदतीने त्या ट्रेलरचालकाचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, कंटेनरला धडक देऊन थांबल्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी चालकाची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याच्या अहवालानंतर या चालकाने दारू किंवा अन्य कोणती नशा केली होती का हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी या बेदरकार ट्रेलरचालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.