50 जागा… 5000 आयटी इंजिनिअर रांगेत, बेरोजगारी बघा! मोदी सरकारचा दावा फेल

बेरोजगारी कमी झाल्याचा केंद्रातील मोदी सरकारचा दावा पुन्हा एकदा फेल झाला असून, ‘आयटी हब’ अशी ओळख असलेल्या पुण्यातही बेरोजगारीचे विदारक वास्तव समोर आले आहे. मगरपट्टा भागातील एका आयटी कंपनीने 50 जागांसाठी जाहीरात दिली होती. त्यासाठी तब्बल पाच हजारांवर तरुण-तरुणींची मुलाखतीसाठी गर्दी झाली. उन्हात एक किलोमीटरपर्यंत तरुणांच्या रांगा लागल्या होत्या.

पुणे शहर आणि परिसरात मोठय़ा प्रमाणावर आयटी कंपन्या आहेत. ‘आयटी हब’ अशी देशातच नव्हे तर जगभरात पुण्याची ओळख बनली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील तरुण येथे नोकरीसाठी येतात. मात्र, आता आयटी क्षेत्रालाही बेरोजगारीने घेरल्याचे स्पष्ट होते. मगरपट्टा परिसरातील यूपीएस लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 50 जागांसाठी जाहीरात दिली होती. त्यासाठी शनिवारी पॅम्पस ड्राईव्ह ठेवला होता. सकाळी 10 वाजता मुलाखतींना सुरुवात झाली. तब्बल पाच ते साडेपाच हजार आयटी इंजिनिआर तरुण-तरुणींची गर्दी झाली होती. नोकरीसाठी आलेली तरुणाई उन्हात तासंतास उभी होती. मोठय़ा रांगा लागल्या होत्या.

नोकऱ्या कुठे आहेत?

आयटी इंजिनिअर्सच्या गर्दीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन हवेत विरले. तरीही बेरोजगारी कमी झाल्याचा दावा मोदी सरकार करते. राज्यातील महायुती सरकारही रोजगार उपलब्ध असल्याचे सांगते. परंतु रोजगार कुठे आहेत? आयटीतील रोजगार गेले कुठे? असा सवाल सोशल मिडियावर विचारला जात आहे.