
माहुल गावमध्ये प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात आलेली चार हजार घरे मुंबई महापालिकेचे कर्मचारी, कामगारांना अल्प दरात मालकी हक्काने मिळणार आहेत. समन्वय समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाकडून तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.
माहुलमधील घरे काही एनजीओंच्या विरोधामुळे रिक्त होती. त्यामुळे पालिकेचे कर्मचारी आणि कामगारांना माहुलमध्ये मालकी हक्काची घरे मिळावीत, अशी मागणी समन्वय समितीकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष व म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, सत्यवान जावकर, के. पी. नाईक, दिवाकर दळवी, अॅड. प्रकाश देवदास, शैलेंद्र खानविलकर, प्रदीप नारकर, रवींद्र पवार यांनी नुकतीच या घरांची पाहणीही केली.
माहुल येथील या सदनिका 225 चौरस फुटांच्या आहेत. ही घरे पालिका कर्मचारी-कामगारांना अल्प दरात द्यावीत अशी मागणी समन्वय समितीकडून करण्यात आली. ही घरे मिळण्यासाठी सभासद आपापल्या सदस्यांशी संपर्क करणार असल्याची माहिती बाबा कदम यांनी दिली.