
नावाने विद्यार्थी असले तरी खो-खोपटू निर्मितीचे खरेखुरे विद्यापीठ असलेल्या विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या खो-खो महोत्सवात किशोर गटात (4 फूट 11 इंच) सरस्वती स्पोर्टस् क्लबने विजेतेपद संपादले, तर व्यावसायिक गटात मध्य रेल्वे (पुरुष) आणि रचना नोटरी वर्क्स (महिला) संघांनी बाजी मारली.
गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळ खो-खो स्पर्धांचे भव्यदिव्य आयोजन आणि नवनवे प्रयोग करणाऱ्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने यंदाही खो-खोच्या वेगवान खेळाचे आयोजन करत अनोखा थरार सादर केला. श्वास रोखायला लावणाऱ्या अंतिम सामन्यांनी खो-खोप्रेमींना प्रजासत्ताक दिनाची आगळी भेट दिली. व्यावसायिक स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्यातला संघर्ष (8-8-9-6) 17-14 अशा गुणांवर संपला. मध्य रेल्वेने अवघ्या 3 गुणांनी बाजी मारली. मध्य रेल्वेच्या दिलीप खांडवीने 1ः10, 2ः20 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात 2 गडी बाद केले. अवधूत पाटीलने त्याच तोडीचा अष्टपैलू खेळ केला. मिलिंद चावरेकर व रोहन शिंगाडेने अप्रतिम वेगवान खेळ करत मध्य रेल्वेला जेतेपदाचा आनंद मिळवून दिला. पश्चिम रेल्वेच्या सम्यक, वृषभ वाघ आणि दीपक माधवने संघाच्या विजयासाठी जोरदार संघर्ष केला, पण तो अपुरा पडला.
महिलांच्या गटातही जेतेपदासाठी रचना नोटरी वर्क्स आणि महावितरण कंपनी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. रचनाने महावितरणचा (6-5-4-6) 11-10 असा अवघा 1 गुण व 1ः10 मिनिटे राखत जेतेपदाला गवसणी घातली. रचनाच्या पूजा फरगडे, श्वेता जाधव यांनी सुसाट खेळ करत जेतेपदावर आपली पकड घट्ट केली. सेजल यादवच्या 3ः20, 1ः40 मिनिटांच्या संरक्षणाने रचनाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महावितरणकडून जोरदार लढत दिली, पण शेवटच्या क्षणी ते जेतेपदाच्या करंडकाचे चुंबन घेण्यापासून वंचित राहिले. व्यावसायिकांच्या स्पर्धेत महिला गटात तिसऱ्या क्रमांकाच्या कडव्या लढतीत महाराष्ट्र पोस्टाने मुंबई पोलिसांचा, तर पुरुष गटात रचना नोटरी वर्क्सने महाराष्ट्र पोस्टाचा पराभव केला.
4 फूट 11 इंच उंचीच्या किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सरस्वती स्पोर्टस् क्लबने विद्यार्थी क्रीडा केंद्रावर (3-1-1-2) 4-3 अशी 1 गुण व 5ः30 मिनिटे राखून मात केली. सरस्वतीच्या मेहक आदवडेने अफलातून खेळत करत नाबाद 6 मिनिटे संरक्षण केले. वरुण गुप्ता आणि शिवम झानेही त्याला उत्कृष्ट साथ दिली.