मैदाने अपूर्णच, मात्र तिकीटविक्रीला आजपासून सुरुवात

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मैदानांच्या नूतनीकरण पूर्ण करण्यासाठी आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) दिलेली डेडलाईन 48 तासांनंतर संपणार आहे. पाकिस्तानातील तिन्ही मैदाने अपूर्णावस्थेतच आहेत. तरीही आयसीसी पीसीबीबाबत मवाळ भूमिका घेत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानात होणाऱया सामन्यांच्या तिकीटविक्रीला उद्यापासून प्रारंभ करीत आहे. यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान व दुबईमध्ये हायब्रिड मॉडेलनुसार खेळविली जाणार असून पाकिस्तानातील तिन्ही मैदाने अपूर्ण असल्यामुळे पीसीबीवर आयोजनाच्या स्थलांतराची टांगती तलवार आहे.

आधीच गोंधळात असलेल्या पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीची तिकिटे विकली जावीत म्हणून तिकिटाची कमीत कमी किंमत एक हजार पाकिस्तानी रुपये (हिंदुस्थानी चलनात 310 रुपये) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रीमियम सिटिंग तिकिटाची किंमत 1500 पाकिस्तानी रुपये (हिंदुस्थानी चलनात 465 रुपये) असेल. अंतिम लढतीची तिकिटे उपांत्य फेरीनंतर उपलब्ध होणार आहेत. पाकिस्तानातील सामन्यांना प्रेक्षकांचा किती सहभाग लाभतोय ते उद्यापासून सुरू होणाऱया तिकीटविक्रीवरून कळेलच. क्रिकेट तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पाकिस्तानचे सामने वगळता अन्य लढतींना निम्मे स्टेडियम रिकामे राहिले तरी आश्चर्य वाटणार नाही. ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून पीसीबीने स्वस्त तिकिटे ठेवली आहेत. यजमान पाकिस्तानला 30 जानेवारीला कराची, लाहोर व रावळपिंडी येथील स्टेडियम आयसीसीकडे सुपूर्द करायची आहेत.