
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिबवेवाडीतील वाहन तोडफोड प्रकरणाचा दाखला देत पिंपरी चिंचवड पोलिसांनाही गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोनच दिवसांत सराईत गुन्हेगार असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने चिखलीत 12 वाहनांची तोडफोड करीत पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
खंडणी दिली नाही म्हणून अल्पवयीन गुन्हेगाराने रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या 12 वाहनांची तोडफोड केल्याची घटना चिखलीतील मोरे वस्ती येथील पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेच्या परिसरात रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कारचालकाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. मोरे वस्ती परिसरातील रहिवासी आपली कार, टेम्पो, रिक्षा अशी वाहने रस्त्याकडेला उभी करतात. दारू पिऊन आलेल्या सराईत गुन्हेगार असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने फिर्यादी कारचालक हे त्यांची कार रस्त्याकडेला उभी करीत असताना त्यांच्याजवळ गेला. त्यांना धमकावत खंडणीची मागणी केली. मात्र, खंडणी देण्यास नकार देताच आरोपी मुलाने दगडाने त्यांच्या कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर दहशत माजवण्यासाठी आजूबाजूच्या कार, टेम्पो, रिक्षा अशा 12 वाहनांची तोडफोड केली. कारचालकाने पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
चिखली पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवड पोलीसआयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरात घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांचा संदर्भ देत पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली होती. भविष्यात अशा घटना पिंपरी-चिंचवडमध्ये होऊ नयेत, यासाठी कडक उपाययोजना राबवण्याबाबत त्यांनी आदेश दिले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये असे प्रकार चालणार नाहीत, असे त्यांनी बजावले होते.