
पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनावर न्यायालयाने 30 जानेवारीला बंदी घातली त्याचवेळी मुंबई महानगरपालिकेने गणेश मंडळांची बैठक बोलवून यावर मध्यमार्ग काढला असता तर आजची परिस्थिती ओढवली नसती, अशी टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली. आता पुढे मोठ्या गणेशोत्सवात काय होईल याचा विचार सरकारने केला आहे का? बहुमतातले सरकार झोपलेय का, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, गणपती मंडळांची भावना न्यायालयात मांडली पाहिजे, अशी आग्रही मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी या मुद्दयावरून संवाद साधला. गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करू नये म्हणून एसीपी, डीसीपी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणत आहेत. असा पोलिसांकरवी दबाव आणण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीसांनी गणेश मंडळांची बाजू ऐकून घेतली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महापालिकेने विसर्जनसाठी कृत्रिम तलाव बांधले, पण कृत्रिम तलावात उंच मूर्ती विसर्जित होऊ शकतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. भाजप केवळ निवडणुकीपुरती हिंदुत्वाचा वापर करते आणि नंतर फेकून देते, आता गणेश विसर्जनात विघ्न आणून मराठमोळे हिंदुत्व पुसण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. मुंबई उपनगरात दोन-दोन पालकमंत्री आहेत, पण एकानेही गणपती मंडळांचे मत जाणून घेतले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भाजपकडून दुसरीकडे हिंदूंमध्ये भीतीही निर्माण केली जाते
भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी यावेळी काही उदाहरणेही दिली. मिंधे सरकारच्या काळात आमदार सदा सरवणकर यांनी गणपती मिरवणुकीत पोलीस ठाण्यासमोर गोळीबार केला होता. त्यांच्यावर ‘यूएपीए’सारख्या कायद्यांतर्गत कारवाई करायला हवी होती; परंतु मिंधे सरकारने त्यांना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बनवले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. वक्फ बोर्डाने मंदिराची जागा मागितली असल्याचे सांगून भाजपकडून दुसरीकडे हिंदूंमध्ये भीतीही निर्माण केली जात असल्याचे ते म्हणाले.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना क्रिकेटला परवानगी
आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्ववादाचा बुरखा फाडला. भाजप हिंदुत्ववादी असल्याचे सांगते, पण त्यांच्याच गोव्यातून अरब राष्ट्रांमध्ये गोमांसासाठी निर्यात केली जाते असे वृत्त गोव्यातील दैनिकात प्रसिद्ध झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी दाखवले. बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असतानाही बांगलादेशबरोबर बीसीसीआयने क्रिकेट खेळायला परवानगी दिली. बांगलादेशला दोन लाख टन तांदूळ निर्यात केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशात घुसलेल्या हिंदुस्थानींना बेड्या घालून परत पाठवले, केंद्रातील भाजप सरकारने हिंदुस्थानात घुसलेल्या किती बांगलादेशींना विमाने, रेल्वे, जहाजांनी परत पाठवले? असा खोचक सवालही त्यांनी केला.