
रॉयल हिल्स सोसायटीतील रहिवाशांना म्हाडाने सर्व व्यक्तिगत नावे हस्तांतरण करताना काही ठरावीक रो हाऊसना अधिकची जागा दिली आहे. इतर रो हाऊसधारकांना मात्र या अधिकारापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे या सदस्यांनी म्हाडाच्या दुटप्पी धोरणाचा विरोध करीत प्रत्येक सदस्यास समसमान जागेचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी मुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली.
गोरेगाव येथील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत एकूण 77 रो हाऊसेस आहेत. म्हाडाने 2006 साली वितरित केले असता येथे रो हाऊसधारकास जागेचे व सर्व इमारतींचे अभिहस्तांतरण करून दिले जाईल असे वित्तीय संस्थेला गृहकर्ज देण्यात आलेल्या ना हरकत प्रमाणपत्रात नमूद केले असून त्यानुसार अभिहस्तांतरण संस्थेच्या नावे करून देणे अपेक्षित होते; परंतु तसे न करता म्हाडाने यापैकी काही जणांना जागेच्या वाटपासंदर्भात एनओसी देत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात येथील काही रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदन दिले असून म्हाडाने सगळय़ांना जागेचे समान वाटप करावे अशी मागणी केली आहे.
विधानसभेत आवाज उठवू – सुनील प्रभू
रॉयल हिल्स सोसायटीतील रहिवाशांची मागणी रास्त आहे. ठरावीक सदस्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय हे योग्य नाही, असे नमूद करत याप्रश्नी विधानसभेत आवाज उठवणार, असे शिवसेना नेते- आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले.