नवी मुंबईतील बेकायदा इमारतीतील फ्लॅट्सचे मीरा-भाईंदरमध्ये रजिस्ट्रेशन

नवी मुंबईतील बेकायदा फ्लॅटच्या महसूल विभागात होणाऱ्या नोंदणीचा मोठा झोल उघडकीस आला आहे. कोपरखैरणे, घणसोली, करावे गावात विजेच्या वेगाने उभे राहत असलेल्या बेकायदा इमल्यांचे रजिस्ट्रेशन थेट भाईंदरमध्ये करण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एकाच दिवशी भाईंदरमध्ये नवी मुंबईतील 102 घरांचे होलसेल रजिस्ट्रेशन झाल्याचे उघडकीस आल्यामुळे संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा निबंधक कार्यालयाने अनधिकृत इमारतीमधील घरांची नोंदणी करू नका, असे आदेश दिल्यानंतरही या नोंदणीचा कारनामा दुय्यम निबंधक कार्यालयाने केला आहे.

नवी मुंबईत खरेदी-विक्री होणाऱ्या घरांच्या आणि मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी महसूल विभागाने वाशी, नेरुळ आणि कोपरखैरणे या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू केले आहेत. मात्र काही दलाल आणि बिल्डरांचे अधिकाऱ्यांबरोबर लागेबांधे असल्याने मोठ्या संख्येने अनधिकृत फ्लॅटची नोंदणी मीरा-भाईंदरमधील दुय्यम निबंधक कार्यालयात केली जात आहे. अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांचे दस्त नोंदणी करू नका, असे आदेश जिल्हा सहनिबंधक वर्ग एक यांनी 4 डिसेंबर 2024 रोजी काढला होते, तरीसुद्धा 6 डिसेंबर 2024 रोजी भाईंदर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात 102 फ्लॅटची नोंदणी एकाच दिवशी बेकायदेशीररीत्या करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

ठाणे जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हा अनधिकृत घरांचा नोंदणी झोल सुरू आहे. अनधिकृत घरांची नोंदणी करण्यासाठी एका घराच्या मागे जवळपास दीड पेटीचा अंडरटेबल व्यवहार होता. अशा पद्धतीने नोंदणी होत असल्याने नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांना मोठा वाव मिळत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे मराठा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी केला आहे.

  1. अनधिकृत फ्लॅटच्या नोंदणीच्या तक्रारी आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एका समितीची स्थापना करून एक अहवाल तयार करण्यात आला. या अहवालामध्ये एका दिवसात झालेल्या १०२ दस्त नोंदणी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.
  2. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील घरे आणि मालमत्ता खरेदी-विक्रीची नोंदणी या तिन्ही महापालिका क्षेत्रात करता येते. याच नियमाचा आधार घेऊन हा नोंदणीचा झोल करण्यात आला आहे.
  3. दिघ्यापाठोपाठ घणसोली आणि गोठीवली हे अनधिकृत बांधकामांचे नवीन हब म्हणून उदयाला येत आहेत. या भागातील काही इमारती तीन-चार फूट पाया खोदून उभ्या केल्या आहेत. सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.