रेल्वेत रंगला साहित्य रसिकांचा मेळा

<<< विदुला झगडे >>>

टाळ-मृदंगांचा गजर अन् ज्ञानोबा, तुकोबांचा जयघोष… कुठे कविता वाचन… तर कुठे रंगलेला एकपात्री प्रयोग… अशा नानाविध कार्यक्रमांनी फिरत्या चाकावरील साहित्ययात्री संमेलन ‘महादजी शिंदे एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेत चांगलेच रंगले. निमित्त होते ते सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे.

पुणे ते दिल्ली सुमारे 31 तासांच्या प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर हे प्रवासी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे व दीर्घ संमेलन ठरले. साहित्यनगरी दिल्लीकडे विशेष रेल्वेतील दीर्घ प्रवासादरम्यान साहित्य रसिकांचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, यासाठी संमेलन आयोजकांनी प्रत्येक बोगीत विविध बहारदार कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याला सर्व साहित्य रसिक आणि साहित्यप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या या प्रवासात कोणी आपल्या कवितांचे सादरीकरण करत होते. प्रेम कविता, राजकीय, विडंबनात्मक असो की सामाजिक व्यवस्थेवर भाष्य अशा कवितांनी प्रवासात चांगलीच रंगत निर्माण केली. केआरकेच्या माध्यमातून हिंदी-मराठी गाण्यांची संगीत मैफील चांगलीच रंगली, त्याला सहप्रवाशांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

याशिवाय फूलचंद नागटिळक या ज्येष्ठ कलाकाराने ‘नटसम्राट’ नाटकातील काही प्रसंग सादर करून सर्वांची वाहव्वा मिळवली. काही बोग्यांमध्ये रसिकांनी साऊंड सिस्टिमवर हिंदी-मराठी गीतांचा आनंद लुटला, तर काही जण गाण्यांवर थिरकले. एका बोगीमध्ये देहूतील वारकरी घोडेश्वर प्रासादिक दिंडीतील हरिभक्तांनी केलेल्या टाळ, मृदंग, पखावजच्या गजराने पहाटे सहा वाजता केलेल्या काकड्यामुळे साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. सहप्रवासीही हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले. याबरोबरच हभप दत्ता महाराज शिंदे, हभप संतोष महाराज शेलार यांनी ‘सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती… ज्ञानियांचा राजा गुरू महाराज…’ या अभंगांचे विश्लेषण करत सहप्रवाशांना त्याचा भावार्थ समजावून सांगितला. सायंकाळी केलेल्या हरिपाठातही सारे सहभागी झाले. सातारहून खास संमेलनासाठी आलेल्या जयश्री माजगावकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा साकारली आहे.

प्रवासातही तत्पर रुग्णसेवा

पुण्यातील कर्तव्य फाउंडेशन मेडिकलच्या सात डॉक्टरांचे पथक आपली मोफत सेवा बजावत आहे. प्रवासादरम्यान तीस रुग्णांना तत्काळ औषध उपचार केले. यामध्ये पित्त, जुलाब, पाठदुखी, कंबरदुखी आदी लहान मुलांपासून मोठ्या रुग्णांवर उपचार केले. सात जणांचे पथक फिरून सेवा बजावत असल्याचे डॉ. ऋषिकेश पाटील आणि डॉ. सय्यद यांनी सांगितले.