
न्यू इंडिया सहकारी बँकेचे गेल्या पाच वर्षांत वेगवेगळय़ा पद्धतीने ऑडिट करणाऱ्या सहा फर्म आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीच्या फेऱ्यात आल्या आहे. त्या सहा फर्मंना तपास पथकाने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी बँकेच्या काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.
बँकेतील 122 कोटींचा अपहार नेमका झाला कसा, एवढा पैसा नेमका गेला पुठे याबाबत अद्याप काहीच स्पष्टता आलेली नाही. पोलीस वेगवेगळय़ा पद्धतीने तपास करीत आहेत, परंतु अरुणचलम हा अद्याप हाती लागलेला नसल्याने तसेच बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन हा स्पष्टपणे काही सांगत नसल्याने 122 कोटींचे नेमके झाले काय ते समजू शकले नाही. हितेश मेहता जे सांगतोय त्यानुसार चौकशी केली जात आहे. दरम्यान, वर्ष 2019 ते 2024 या कालावधीत वेगवेगळय़ा मेसर्स यू. जी. देवी अॅण्ड पंपनी, मेसर्स गांधी अॅण्ड असोसिएट, मेसर्स शिंदे नायक अॅण्ड असोसिएट, मेसर्स जैन त्रिपाठी अॅण्ड पंपनी, संजय राणे अॅण्ड असोसिएट, मेसर्स एस. आय. मोगुल अॅण्ड पंपनी या वेगवेगळय़ा फर्मने ऑडिट केले होते. या सर्व फर्मंना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी संजय राणे अॅण्ड असोसिएटचे अभिजित देशमुख या सीएकडे पोलिस चौकशी करीत आहेत. देशमुख यांनी बँकेचे ऑडिट केले होते तसेच बँकेला ‘ए’ ग्रेड दिले होते. त्यामुळे देशमुखकडे कसून चौकशी सुरू आहे. सद्यस्थितीत ऑडिट करणाऱ्यांकडे चौकशी होईल. तसेच आवश्यकता पडल्यास फॉरेन्सिक ऑडिटदेखील केले जाईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने पैसे दाखवले
प्रभादेवी व गोरेगाव येथील तिजोऱ्यांमध्ये 133.41 कोटी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी 12 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष तपासणी केली तेव्हा प्रभादेवी येथील तिजोरीत 60 लाख तर गोरेगाव तिजोरीत 10.53 कोटी अशी मिळून एपूण 11.13 कोटी इतकी रोकड सापडली होती. मुळात बँकेकडे 20 कोटी इतकी रोकड ठेवण्याची परवानगी होती. प्रभादेवी येथील तिजोरीत 10 कोटी रुपये ठेवण्याची क्षमता असताना तेथून 122 कोटी गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमके कशा प्रकारे आणि किती जणांनी हा पैशांचा अपहार केला, ते स्पष्ट होत नसल्याने पोलीस कसून तपास करीत आहेत.