
मंत्रीपद न मिळाल्याने भारतीय जनता पक्षातील नाराज आमदारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या समित्यांवर पुनर्वसन केले आहे. भाजपच्या 11 आमदारांची विविध समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात रवी राणा, राम कदम, अतुल भातखळकर यांचा समावेश आहे. मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या कोटय़ातील नियुक्त्या मात्र अद्याप अधांतरीच आहेत.
विधिमंडळाच्या सन 2024-25 या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची यादी भाजपकडून आज जाहीर करण्यात आली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आमदार राहुल पुल यांना सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे तर पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे-पाटील यांची वर्णी लागली आहे. आश्वासन समिती–रवी राणा, अनुसूचित जाती कल्याण समिती -नारायण पुचे, अनुसूचित जमाती कल्याण समिती-राजेश पाडवी, महिला हक्क व कल्याण समिती-मोनिका राजळे, इतर मागासवर्गीय कल्याण समिती-किसन कथोरे, मराठी भाषा समिती-अतुल भातखळकर, विशेष हक्क समिती-राम कदम, धर्मादाय खासगी रुग्णालय तपास समिती-नमिता मुंदडा आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदावर सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या कोटय़ात 11, मिंधेंच्या 6 आणि अजित पवार गटाच्या कोटय़ात 3 समित्या आहेत. मिंधे व अजितदादांच्या गटाच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत.