महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाचे अवतरणार पिळदार ग्लॅमर, रविवारी प्रभादेवीत ‘स्वामी समर्थ श्री’

क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पिळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे.  आमदार महेश सावंत यांच्या कल्पक आयोजनाखाली प्रभादेवीत दै. ‘सामना’ शेजारील दत्तू बांदेकर चौकात रविवारी 9 मार्चला होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकापेक्षा एक अशा 125पेक्षा अधिक खेळाडूंमध्ये द्वंद्व रंगलेले पाहायला मिळणार आहे.

गेली आठ दशके कबड्डीसह शरीरसौष्ठव खेळात एकापेक्षा एक स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबर खेळाडू घडवणाऱ्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदा आपल्या स्पर्धेला भव्य आणि दिव्य करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिह्यातून शरीरसौष्ठवांना स्वामी समर्थ श्रीमध्ये येण्याचे आवाहन केले असल्याचे स्पर्धा प्रमुख जयराम शेलार यांनी सांगितले. त्यामुळे सुमारे सव्वाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. सव्वा तीन लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणाऱ्या या स्पर्धेत विजेत्याला 55,555 रुपयांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच उपविजेत्याच्या मेहनतीलाही प्रोत्साहन म्हणून 22,222 रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 80 किलोवरील अशा एकंदर सात गटांत खेळली जाणार आहे.

शशांक वाकडेवर सर्वांचे लक्ष

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने या स्पर्धेची भव्यता वाढविण्यासाठी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेत भारत श्री स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणारे शशांक वाकडे (मुंबई), विश्वनाथ बकाली (सांगली), रामा मायनाक (सातारा), नितीन म्हात्रे (पश्चिम ठाणे), रोशन नाईक (पालघर) या दिग्गजांसह अर्शद मेवेकरी (सांगली), ओंकार नलावडे (पुणे), पंचाक्षरी लोणार (सोलापूर), संतोष शुक्ला (ठाणे), नीलेश खेडेकरसारखे (मुंबई) तयारीतले खेळाडू आपल्या पिळदार देहयष्टीची किमया दाखविणार आहेत. प्रभादेवीत अनेक वर्षांनंतर राज्यस्तरीय ग्लॅमर असलेली मोठी स्पर्धा होतेय, ज्यात महाराष्ट्र शरीरसौष्ठवाची खरी पिळदार श्रीमंती मुंबईकरांना पाहायला मिळेल. संपर्क ः  राजेंद्र चव्हाण (9870023235), राज यादव (9619477251), राजेंद्र गुप्ता (9820767403).