औरंगजेबाच्या कबरीला केंद्राने साडेसहा लाखांचा निधी दिला

छत्रपती संभाजी महाराज यांचा अनन्वित छळ करून क्रूर हत्या करणाऱया औरंगजेबावरून राज्यात वातावरण तापले आहे. औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱया सपा आमदार अबू आझमींचे विधानसभेत निलंबन करण्यात आले. मात्र, औरंगजेबाच्या कबरीसाठी केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडूनच पैसा पुरवला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. औरंग्याच्या कबरीची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी लाखो रुपये अनुदान दिले जात आहे.

हिंदू जनजागृती समितीने माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती मिळवली आहे. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळ रत्नपूर येथे औरंगजेबाची कबर आहे. केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडून 2011पासून आतापर्यंत साडेसहा लाख रुपये औरंगजेबाच्या कबरीसाठी दिले. सुरुवातीला 47 हजार, त्यानंतर 80 हजार, त्यापुढे 15 हजार, मग 2 लाख 55 हजार आणि नुकतेच 2 लाख 60 हजार रुपये दिले आहेत.

सहा कर्मचारी तैनात

पुरातत्व विभागाचे  सहा कर्मचारी औरंगजेबाच्या कबरीसाठी काम करतात. वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती, डागडुजी सुरू असते. त्यासाठी पैसे खर्च केले जातात. कधी हा आकडा 15 लाखांपर्यंत जातो, अशी माहिती आहे. दरम्यान, अनुदान तत्काळ थांबविण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील राजराजेश्वर मंदिराला 1970पासून अनुदान देण्यात आलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

कबर उखडून टाका -उदयनराजे

‘औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक होता. तो चोर होता. तो लुटायला आला होता. त्याचे उदात्तीकरण का आणि कशासाठी करायचे? औरंगजेबाची कबर जेसीबी लावून उखडून टाका,’ असे स्पष्ट मत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱयांवर कठोर कारवाई करण्यासाठी याच अधिवेशनात कायदा करा,’ अशी मागणीही त्यांनी केली.  प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, अबू आझमी ही केवळ नावे आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर उद्या कोणीतरी अनिल, सोम्या, गोम्या अशी आक्षेपार्ह वक्तव्ये करतील.   या गुह्यासाठी किमान 10 वर्षांची शिक्षा पाहिजे, असेही ते म्हणाले.