
अमेरिकेने 9 नेपाळी बेकायदा स्थलांतरितांना मायदेशी परत पाठवले. सर्वजण काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. परंतु, त्याच्या हातात बेडय़ा आणि पायात साखळदंड नव्हते. ते अतिशय सहज आणि आनंदाने बाहेर येताना दिसतात. इथे कुठलाही चौकशीचा फार्स नव्हता. त्यांना सन्मानाने मायदेशी पाठवले तर दुसरीकडे हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांना हातात बेडय़ा आणि पायात साखळदंड अशा अवस्थेत कित्येक तास एकाच जागेवर बसवून त्याना मायदेशात पाठवले. असा दुजाभाव अमेरिकेने करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का, असा सवाल विरोधकांनी केला असून देशभरात याप्रकरणी प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांना बेडय़ा आणि साखळदंडाने जखडून लष्कराच्या विमानातून पाठवण्यात आले. ना स्वच्छतागृहात जाण्याची परवानगी होती ना पुरेसे पाणी आणि अन्न देण्यात आले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचीही त्यांना दया आली नाही. नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला, ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतरही हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांच्या हातातून बेडय़ा निघाल्या नाहीत की साखळदंड… दरम्यान, ट्रम्प हे आपले मित्र असल्याचे मोदी सांगतात, मग बेकायदा स्थलांतरितांना दिलेल्या वागणुकीवर आणि अपमानाबाबत मोदी गप्प का? त्यांना थोडीतरी लाज वाटायला हवी, अशा शब्दांत काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.
कोलंबियाने सन्मानाने नागरिकांना परत आणले
अमेरिकेने कोलंबियातील बेकायदा स्थलांतरितांना लष्करी विमानाने परत पाठवले. परंतु, कोलंबियाने ही विमाने आपल्या भूमीवर उतरवून दिली नाहीत. त्यानतंर आपली विमाने अमेरिकेत पाठवून आपल्या देशातील नागरिकांना सन्मानाने परत आणले. अमेरिकेने नेपाळी बेकायदा स्थलांतरितांनाही लष्करी विमानाने न पाठवता चार्टर्ड विमानाने मायदेशी पाठवले. त्यांना इतका सन्मान आणि हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांना अमानुष वागणूक.. असे का? असा सवाल देशभरातील नागरिकांनी केला आहे.