
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गगनभेदी जयघोषाने आज फोर्टचा परिसर दुमदुमला. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने आयोजित भव्यदिव्य शिवराय संचलन पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात, मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध आस्थापनांमधील मराठी अधिकारी आणि कर्मचारी, शिवसैनिक आणि हजारो शिवप्रेमी नागरिक या संचलनात सहभागी झाले होते.
फोर्ट येथील रिझर्व्ह बॅंकेच्या अमर बिल्डींग येथे फुलांची आकर्षक सजावट केलेल्या ट्रकवर ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून संचलनाला सुरूवात झाली. ट्रकच्या मागोमाग शिवरायांची पालखीही होती. भगवी उपरणी परिधान केलेले, भगवे फेटे घातलेले आणि भगवे झेंडे हाती घेतलेले शिवप्रेमी आणि संचलनमार्गावर लावलेले भगवे झेंडे यामुळे फोर्ट परिसरच भगवामय झाला होता.
हॉर्निमन सर्कलमार्गे हुतात्मा चौकात संचलन पोहोचल्यानंतर तिथे हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर रिगल सिनेमा येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. हिंदुस्थानचे प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ पुन्हा गगनभेदी जयघोषाने संचलनाची सांगता झाली.
शिवराय संचलन सोहळ्यात शिवसेना नेते विनायक राऊत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष-शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, उपनेते-आमदार सचिन अहिर, अमोल कीर्तिकर, लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, सरचिटणीस प्रदीप मयेकर, आमदार महेश सावंत सहभागी झाले होते.
मराठी माणसाला विभागण्याचे षड्यंत्र – अनिल देसाई
महाराष्ट्रात जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण करायचा, मराठी माणसांमध्ये जाती-पोटजातींवरून भांडणे लावायची आणि समाजाची विभागणी करायची असे भारतीय जनता पक्षाचे कुटील कारस्थान सुरू असल्याचा आरोप यावेळी शिवसेना नेते अनिल देसाई यांनी केला. महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना गुजरातद्वेष्टी असल्याचे दाखवण्याचेही षडयंत्र मुंबईत सुरू आहे, पण जनता त्या षडयंत्राला बळी पडणार नाही असेही ते म्हणाले. पुढच्या वर्षी शिवराय संचलनाचा सुवर्ण महोत्सव दणक्यात साजरा करणार असेही ते म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरीवर सेवेसाठी केंद्रीय कर्मचारी – अरविंद सावंत
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर टीका केली. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर सेवा करण्यासाठी केंद्र सरकारने अधिकृतरित्या सहा कर्मचारी नेमले असून कबरीच्या देखभालीसाठी मोठा निधीही दिला जातो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
संचलनात महाराष्ट्राची परंपरा जपणारे वारकरी टाळमृदुंगाच्या तालावर पांडुरंगाच्या भजनात तल्लीन झाले होते. वारकऱ्यांच्या पाठोपाठ धारकरी म्हणजेच तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक असे शिवकालीन खेळ करणारे पथक होते. संपूर्ण संचलनमार्गावर त्यांचे मर्दानी खेळ सर्वांचे आकर्षण ठरले होते.