हाती नाही आणा आणि बाजीराव म्हणा! तिजोरीत खडखडाट असूनही घोषणांचा पाऊस; ठाणे महापालिकेचे 5 हजार 645 कोटींचे आभासी बजेट

‘हाती नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी ठाणे महापालिकेची अवस्था झाली आहे. तिजोरीत खडखडाट असूनही विविध घोषणांचा पाऊस पाडत आयुक्त सौरभ राव यांनी आज 5 हजार 645 कोटींचे ‘आभासी’ बजेट जाहीर केले. सरकारने लटकवलेले तीन हजार कोटींचे अनुदान, 65 कोटींच्या कर्जाचा डोंगर, 1 हजार 194 कोटींची ठेकेदारांची देणी अशी बिकट स्थिती असताना अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना कशा पूर्ण करणार, असा थेट सवाल ठाणेकरांनी केला आहे. पण आयुक्तांनी मात्र आकड्यांची ‘हेराफेरी’ करीत अर्थसंकल्पामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. कोणतीही करवाढ, दरवाढ नाही एवढाच काय तो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

2025-26च्या बजेटमध्ये 3 हजार 722 कोटी 93 लाख एवढा महसुली खर्च दाखवला असून भांडवली खर्च 1 हजार 921 कोटी 41 लाख रुपये एवढा आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली गेल्या वर्षी समाधानकारक झाली नाही. त्यामुळे यंदा शहरातील सर्व मालमत्तांचे एआयद्वारे सर्वेक्षण करून वसुलीवर भर दिला जाणार आहे.

ठाणेकरांना डबलडेकरमधून प्रवास करता येईल, असे स्वप्न मागील अर्थसंकल्पात प्रशासनाने दाखवले होते. पण हे स्वप्न अखेर स्वप्नच ठरले आहे. परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी टीएमटीचा 895 कोटी 35 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला त्यात ही बाब स्पष्ट झाली आहे.

सध्या सुरू असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा व रमझानमुळे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवरील कारवाई सध्या थांबली असल्याची कबुली आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

या योजनांसाठी तरतूद

  • महिला सुरक्षा 20 लाख
  • ज्येष्ठ नागरिक केंद्र 2 कोटी
  • दिव्यांग कल्याणकारी योजना 17 कोटी
  • तृतीयपंथीयांसाठी समुपदेशन 15 लाख
  • कळवा हॉस्पिटलचे नूतनीकरण 75 कोटी
  • प्रसूतिगृहांचे नूतनीकरण 11 कोटी मराठी शाळांचे सक्षमीकरण 3 कोटी
  • मॉडेल स्कूल 50 कोटी
  • बॅडमिंटन हॉल विस्तारीकरण 41 कोटी
  • परिवहनला अनुदान 280 कोटी
  • क्रीडाग्राम 5 कोटी
  • नवीन पालिका मुख्यालय 572 कोटी
  • शौचालयांची दुरुस्ती 72 कोटी

धर्मवीरांवरील प्रेम बेगडी; स्मारकासाठी तरतूदच नाही

उपवन येथील महापौर निवासामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र या वर्षीच्या बजेटमध्ये त्याचा उल्लेखही नाही. ठाणे महापालिकेचे प्रेम बेगडी असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.