
वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमी येथे तत्काळ उच्च दाबाचे (हायमास्ट) दिवे बसवावेत, अशी मागणी शिवसेनेने केली असून दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांना तसे पत्र पाठवण्यात आले आहे. तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी स्मशानभूमीच्या सुरक्षेसाठी चार सर्च टॉवर उभारून प्रखर प्रकाशाचे दिवे लावले होते. मात्र स्मशानभूमीच्या कामादरम्यान अंतिम संस्कार ट्रस्टकडून तेथील तीन सर्च टॉवर काढण्यात आले. उरलेला एक टॉवर वाऱ्यामुळे पडला.
सध्याच्या स्थितीत बेस्टच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या दिव्यांचा प्रकाश कमी दाबाचा असल्यामुळे तिथे सर्वत्र अंधार असतो. याचा फायदा घेत अमली पदार्थांचे सेवन करणारी मुले व दारुडे यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 5 मार्च रोजी रात्री काही मुलांनी नशा करून मागे असलेल्या कांबळी नगरामध्ये एका तरुणाची हत्या केली. स्मशानभूमीच्या सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी अनुचित प्रकार घडत असतात. त्यामुळे तत्काळ उच्च दाबाचे दिवे लावण्यात यावेत, अशी मागणी वरळी विधानसभेचे युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी केली आहे.