
पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना सुरक्षेसाठी झगडावे लागतेय. महिला सुरक्षेसाठी सरकारने केलेली तरतूदही तुटपुंजी आहे. राज्यात सगळीकडेच महिला असुरक्षित आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी गांभीर्याने पावले उचलली जात नाहीत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना 25 हजार महिला पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले, असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरकारला केला.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिलांच्या असुरक्षिततेवरून सरकारला धारेवर धरले. पुण्याच्या स्वारगेट डेपोमध्ये महिलेवर अत्याचार झाला, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली, सगळीकडेच महिला असुरक्षित असतील तर सुरक्षित कोण, असा सवाल वडेट्टीवार यांनी सरकारला केला.
भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्या नितेश राणेंचा राजीनामा घ्या
वडेट्टीवार यांनी यावेळी भडकाऊ विधाने करणारे भाजप आमदार नितेश राणे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तातडीने घेतला पाहिजे, अशी मागणी केली. नागपूरमध्ये हिंसाचार भडकल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छावा’ चित्रपटाला दोष दिला, पण राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री संविधानाची शपथ घेऊन द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहे, त्या मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.


























































