
नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून खोदून काढू, कोणालाही सोडणार नाही. बाकी सर्व गोष्टी क्षम्य आहेत, पोलिसांवरचा हल्ला क्षम्य नाही. हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
विधानसभेत 2025-26 च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगल प्रकरणात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. नागपूरची घटना ही पूर्वनियोजित होती. नागपूर पोलीस आयुक्तांनी याबाबत वेगळे मत मांडलेले नाही. त्यांच्याकडून माहिती घेऊनच आपण सभागृहाला माहिती दिली. नागपूर हे शांत शहर आहे. 1992 नंतर नागपूरमध्ये कधीही दंगल झालेली नाही. मात्र, परवाची घटना काहींनी जाणीवपूर्वक घडवून आणल्याचे लक्षात येत असल्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
औरंगजेबाच्या कबरीची प्रतिकृती जाळली; मात्र त्यावर कुठेही आयत लिहिलेली नव्हती. तरीही जाणीवपूर्वक आयत जाळल्याचे संदेश फिरवले गेले. त्यामुळे या प्रकरणात विशिष्ट वेळेत कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी सभागृहाला दिले.
पोलीस भरती
पोलीस दलात 10 हजार 500 जागा रिक्त असून गेल्या तीन वर्षांत पोलिसांची विक्रमी 35 हजार 802 पदे भरण्यात आली आहेत. नागपूर हिंसाचार प्रकरणात ज्यांनी सामाजिक स्वाथ्य बिघडवले त्यांच्यावर कारवाई होईलच. या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. शिवाय ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांनाही या घटनेत दोषी धरले जाईल, देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अभिषेक घोसाळकर प्रकरणाची चौकशी सुरूच
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या संदर्भातील चौकशी जवळपास पूर्ण झालेली आहे. आरोपपत्र दाखल केलेले आहे. फेसबुक लाईव्ह करून हत्या करणाऱ्या मॉरीस नरोन्हा यांच्याविरोधात पुरावे मिळालेले आहेत, पण यामध्ये अजून काही आहे का म्हणून मी पोलिसांना विचारले आहे. यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले असले तरी चौकशी बंद करू नका. त्यात अजून काही अँगल सापडतात का हे बघणे सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


























































