
अरुण क्रीडा मंडळ आयोजित कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजय नवनाथ, नवोदित, तर ‘ब’ गटात विजय बजरंग, श्री साई यांनी विजयी सलामी दिली. विजय गोपाळ तोंडवळकर क्रीडा नगरीत झालेल्या कुमार गटाच्या स्पर्धेत लोअर परेलच्या विजय नवनाथने गुड मॉर्निंगला 34-27 असे 7 गुणांनी पराभूत केले. आयुश शिरावडेकर, तनिश गावडे हे विजय नवनाथच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पराभूत संघाकडून श्रवण तिरोडकर, सुजन दळवी यांचे प्रयत्न अपुरे पडले. याच गटातील अन्य लढतीत नवोदितने शिवडीच्या अमर क्रीडा मंडळाला 39-24 अशी 15 गुणांनी धूळ चारली.
विजयी संघाचे अथर्व सुवर्णा, रजत मुल्लानी यांनी चांगली कामगिरी केली. ‘ब’ गटात विजय बजरंगने वरळीच्या अमर क्रीडा मंडळाला 35-12 असे सहज पराभूत केले. ओम नेमन, अनिकेत रामाणे यांनी विजय बजरंग संघासाठी चमकदार कामगिरी केली. याच गटातील अखेरच्या सामन्यात श्री साई क्लब वरळी संघाने चिंतामणी प्रतिष्ठानला 30-27 असे 3 गुणांनी नमविले. विजयी संघातर्फे शैलेश म्हात्रे, निलेश तांडेल यांनी चांगली कामगीरी केली.