मुंबईतल्या टँकर चालकांच्या संप, मेट्रो-कोस्टल रोडच्या कामांवर परिणाम

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांमध्ये केवळ 33 टक्के पाणीसाठा शिल्लक असताना आता केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संपाचे हत्यार उपसले आहे. मुंबई पालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नवे नियम लागू केल्याने गुरुवार, 10 एप्रिलपासून असोसिएशनने बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांनी पेंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल, अशी नोटीस मुंबई पालिकेकडून आल्याने अनेक विहीर आणि बोअरवेल मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याने पाणीपुरवठा कसा करायचा, या चिंतेमुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने या निर्णयाविरोधात वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट असताना आता वॉटर टँकर असोसिएशने बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने त्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.
बांधकामांनाही बसणार फटका  
मुंबईतील विविध भागांत आधीच पाणीटंचाई असल्यामुळे टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना या टँकर्स बंदीचा फटका बसणार आहेच, पण रोजच्या गरजेसाठी वापरल्या जाणाऱया झोपडपट्ट्या, मॉल आणि इमारतींच्या बांधकामांनाही बसणार आहे. मुंबईत मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू असून त्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. त्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या संपाचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसणार आहे.
केंद्र सरकारच्या भूजल प्राधिकरणाने लादलेले नियम हे अत्यंत चुकीचे आहेत. मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून आम्हाला सातत्याने त्रास दिला जात आहे. आम्हाला नोटिसा दिल्या जात आहेत. आम्हाला मुंबईकरांचा पाणीपुरवठा बंद करायचा नाही. पण आमचा नाइलाज आहे. राज्य सरकारने आम्हाला संपाचे हत्यार उपसायला भाग पाडले आहे. त्यामुळे आमच्या 358 सदस्यांचे 1800 टँकर्स गुरुवारपासून रस्त्यावर धावणार नाहीत.  – जसबीरसिंह बिरा, अध्यक्ष, मुंबई वॉटर टँकर असोसिएशन