प्रदूषण नियंत्रण महामंडळ कुठे आहे? अदानी व्हेंचर्स कंपनीतील स्फोटाची तज्ज्ञांकडून चौकशी

उद्योगपती गौतम अदानी यांच्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीतील स्फोटाची तज्ज्ञांकडून चौकशी करण्यात येत आहे. संबंधित तज्ज्ञांच्या अहवालानंतर योग्य ती पावले उचलण्यात येतील असा दावा व्यवस्थापनाने केला आहे. दरम्यान, ही चौकशी कंपनीतील तज्ज्ञ करणार असून प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्याची दखल का घेतली नाही, असा सवाल उरणवासीयांनी केला आहे.

उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीच्या हद्दीत इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड ही कंपनी असून बुधवारी संध्याकाळी नाफ्ताच्या टाकीची दुरुस्ती व सफाई सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. त्यात रोहित सरगर हे अभियंता जखमी झाले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

कोणाची मेहेरबानी?
कंपनीत स्फोट किंवा आगीची घटना घडल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धाव घेऊन चौकशी करतात. पोलीसही स्वतंत्रपणे अशा घटनांची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतात. मग अदानी यांच्या कंपनीत स्फोट झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकही अधिकारी का फिरकला नाही, असा प्रश्न धुतूमवासीयांना पडला आहे. या कंपनीवर सरकारची मेहेरबानी आहे काय असेही बोलले जाते. दरम्यान, अदानी व्हेंचर्स कंपनीने आज प्रसिद्धीपत्रक काढून तज्ज्ञांकडून चौकशी सुरू केली असल्याची सारवासारव केली.