सृजन संवाद – राम आणि परशुराम 

>> डॉ. समिरा गुजर जोशी

चैत्र – वैशाख महिन्यांमध्ये रामायण कथेशी निगडित अनेक उत्सव साजरे होतात. मुळात गुढीपाडव्याचे नाते रामाच्या विजयाशी जोडलेले आहेच. रामनवमी, हनुमान जयंती, सीता नवमी हे तर आहेतच, पण अक्षय तृतीयेला परशुराम जयंती असते. परशुरामांचे पात्रही रामायणात एका महत्त्वाच्या टप्प्यावर येते. आज राम आणि परशुराम यांच्याविषयी जाणून घेऊ या. खरे तर दोघेही विष्णूचेच अवतार आणि दोघेही राम, एक रघुकुलदीपक राघवराम तर एक भृगुकुलनंदन भार्गवराम. दोघे शिवभक्त. असे सारे असूनही परशुराम वयाने जेष्ठ असताना तरुण श्रीरामांवर संतापले आणि त्यांनी त्यांना द्वंद्वासाठी आव्हान दिले असा प्रसंग रामायणाच्या बालकांडात येतो. तीच कथा आज जाणून घेऊ.

राम-सीतेचा विवाह संपन्न झाल्यानंतर दशरथ राजासमवेत सगळे मिथिला नगरीहून अयोध्येकडे जाण्यास निघाले आणि रस्त्यात एके ठिकाणी अचानक काही विचित्र संकेत मिळू लागले. एखादे वादळ येण्यापूर्वी जशी स्थिती असते तशी स्थिती निर्माण झाली. पक्षी भयाने ओरडू लागले. धुरळा उडू लागला. इतके विचित्र वातावरण निर्माण झाले की, अनेक लोक तर मूर्च्छित झाले. दशरथ राजा, राम-लक्ष्मण, वसिष्ठादी ऋषी असे काही निवडक लोक भानावर होते. अशा वेळेस समोरून परशुरामांची उग्र मूर्ती येताना दिसली. त्यांचे वर्णन करताना वाल्मीकी ऋषींनी म्हटले आहे – “साक्षात कैलास पर्वतासारख्या धिप्पाड देहयष्टीचे, प्रलयकारी अग्नीप्रमाणे दुःसह तेज असणारे, एका हाती परशू आणि एका हाती धनुष्य धारण केलेले, साक्षात शिवाचेच रूप वाटणारे असे परशुराम तिथे उपस्थित झाले.”

परशुरामांना इथे पाहून वशिष्ठ मुनींसमवेत सारेच आपापसात कुजबुजू लागले, “अहो, पित्याचा वध सहन न करणारे परशुराम क्षत्रियांचा उच्छेद करण्याच्या उद्देशाने तर येथे आले नाहीत ना?”

भगवान परशुरामांच्या कर्तृत्वाचा दबदबा इथे नक्की जाणवतो. त्यांच्या पित्याला, जमदग्नी ऋषींना मारण्याचे जे अन्यायी कृत्य सहस्रबाहू अर्जुनाच्या मुलांनी केले, त्यानंतर भगवान परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी क्षत्रियरहित केली. हा त्यांचा पराम सर्वश्रुत आहेच, पण आता रामासारख्या परामी, पण सद्वर्तनी क्षत्रियाविरुद्ध परशुराम का बरे उभे ठाकले आहेत, याचे प्रत्येकाला आश्चर्य आणि धास्ती वाटते आहे. परशुरामांनी आपल्या येण्याचे कारण सांगितले. रामाने शिवधनुष्याचा भंग केला हे त्यांच्या कानी आले आणि त्यांना आश्चर्य वाटले. हे अद्भुत कार्य करणाऱया वीराची स्वत परीक्षा पहावी म्हणून ते आले आहेत हे कारण स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, रामाने माझ्या हाती असलेल्या विष्णूच्या धनुष्याला प्रत्यंचा चढवून दाखवावी आणि माझ्याबरोबर द्वंद्वयुद्ध करावे. हे ऐकल्यानंतर दशरथ तर पार गांगरून जातो. तरुण रामांना या अशा कठोर परीक्षेला सामोरे जायला लावू नका म्हणून विनवणी करू लागतो. या सगळय़ात अविचल आहेत ते फक्त प्रभू श्रीराम.

त्यांनी या आव्हानाचा स्वीकार केला तोही अतिशय बाणेदारपणे. ते म्हणाले, “आपण आम्हा सगळ्यांसाठी आदरणीय आहात, पण तुम्ही हे असे आव्हान देऊन मला अवमानित करत आहात. जणू आपल्याला माझ्या परामाविषयी शंका आहे. ठीक आहे. मग पहा माझा पराम.” असे म्हणून श्रीराम ते शिवधनुष्याइतकेच प्रचंड असे विष्णूचे धनुष्य सहज हाती घेतात. त्यावर बाणही चढवतात आणि मग पेचात टाकणारा प्रश्न परशुरामांना विचारतात, “या अमोघ अशा वैष्णव धनुष्यावर बाण चढवल्यावर तो व्यर्थ कसा जाऊ देऊ? आता याचे लक्ष्य मी काय करू ते सांगा? एकतर तुमची गती मी कुंठीत करतो किंवा तुमच्या तपाने जे पुण्यलोक निर्माण झाले आहेत, त्यांच्यावर हा बाण रोखतो. तेव्हा परशुरामांनी उत्तर दिले, “माझी गती मला महत्त्वाची आहे. पुण्यलोक तू नष्ट कर.” त्यानंतर दोघेही एकमेकांचे पूजन करतात.

ही कथा वाचल्यानंतर मनात शंका येते की, ही कथा वाल्मीकी रामायणात का बरे सांगण्यात आली आहे? पुढे कुठेही वाल्मीकी रामायणात परशुरामांचा उल्लेख नाही. येथेही ते अचानक येतात आणि जातात, पण या कथा भागाने एक गोष्ट साध्य होताना दिसते. राम हे क्षत्रिय म्हणून, राजा म्हणून किती तेजस्वी आहेत याची. परीक्षा जणू परशुराम घेतात आणि ती परशुरामांनीच घ्यावी असा त्यांचा अधिकार आहे. स्वत राम म्हणतात की, आपण आपल्या पित्याच्या निधनानंतर जे केले, त्यामुळे तुम्ही आदरास पात्र झाले आहात. त्यामुळे परशुराम यांचा राग हा सरसकट क्षत्रियांविरुद्ध नसून अन्यायी राजांविरुद्ध होता. त्याविषयी क्षत्रियांनाही आदर होता हेही कळून येते. ही कथा समन्वय साधण्यासाठीच आली असावी. शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये समन्वय हवा, आदर हवा. समाजात सामंजस्य असायला हवे हे सांगण्यासाठी बहुधा या कथेची योजना करण्यात आली आहे.

[email protected]

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृतमराठी वाङमयाची अभ्यासक)