
देशभरात झालेल्या नीट 2004 च्या परीक्षेतील फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. एमबीबीएसच्या दोन विद्यार्थ्यांनी डमी उमेदवार बनून नीटची परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी डॉ. एस. एन. मेडिकल कॉलेज ऑफ जोधपूर येथून एमबीबीएस करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलंय. सीबीआय तपासात दोघे दोषी आढळले आहेत. अशा अनेक डमी उमेदवारांनी नीटची परीक्षा दिल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
नीट परीक्षेतील फसवणुकीचा तपास सीबीआयने नुकताच पूर्ण केला. तपासात असे आढळून आले की, भागीरथराम बिश्नोई याने आपला भाऊ गोपाल राम याच्या जागी परीक्षा दिली. पोलिसांनी या दोन्ही भावांना अटक केली. त्याच वेळी हर्षिल मेहला हा विनीत गोदाराचा डमी बनून परीक्षेला पोहोचला.
याशिवाय एम्स जोधपूर येथून एमबीबीएस करणाऱ्या हुक्काराम याला बिहारच्या मुजफ्फरापूर येथे नीट परीक्षेच्या वेळी बायोमेट्रिक तपासात पकडण्यात आले. हुक्काराम एका डॉक्टरच्या मुलाच्या जागी परीक्षा देत होता. त्या बदल्यात त्याला 4 लाख रुपये मिळणार होते. हुक्कारामलाही कॉलेजमधून निलंबित करण्यात आलेय. जोधपूर, जालोर आणि भिलवाडा येथील अनेक विद्यार्थ्यांविरोधात कारवाई प्रस्तावित आहे.