
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पर्यटक आणि सैन्यातील अधिकाऱ्यांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला. यावरून केंद्र सरकारचे काश्मीर धोरण फेल ठरल्याची टीका होत आहे. यानंतर अखेर केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थानच्या सैन्यातील तिन्ही दलांना लष्कर, नौदल आणि हवाई दलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ठोस कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षण सचिव आणि सैन्य दलांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. तर जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संध्याकाळी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी सहा वाजता श्रीनगरमध्ये कॅबिनेटची बैठक होणार आहे.
संरक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कश्मीर खोऱ्यातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या सुरक्षा परिस्थितीची माहिती राजनाथ सिंह यांना दिल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. घटना स्थळी उच्च अधिकाऱ्यांना रवाना करण्यात आले आहे आणि स्थानिक पथकांना सतर्क राहण्यास आणि दहशतवादविरोधी कारवाया आणखी तीव्र करण्यास सांगण्यात आले आहे. शोध मोहीम राबण्यासाठी हल्ल्याच्या ठिकाणाजवळील भागात आणखी जवानांची तैनाती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेच ते क्रूरकर्मा दहशतवादी! पर्यटकांना ठार मारणाऱ्या संशयित दहशतवाद्यांचा फोटो प्रसिद्ध
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या बैसरन येथील हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि घटनेची माहिती घेतली. तसेच अमित शहा यांनी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवादासमोर हिंदुस्थान कधीही झुकणार नाही. या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांना सोडणार नाही, असा इशारा अमित शहा यांनी यावेळी दिला.