
टोपी कुणीही उडवू शकतो याची कल्पना गेल्या आठवडय़ात आली होती आणि ती उडवाउडवी काल पाहायलाही मिळाली. काल चक्क तीन डोक्यांवर ऑरेंज कॅप सजली होती; पण साई सुदर्शनने अवघ्या एका दिवसात आपली कॅप पुन्हा मिळवली आणि फलंदाजांमध्ये आपले अव्वल स्थान पुन्हा बळकावले आहे.
काल साई सुदर्शन 417 धावांवर अव्वल होता. काल मुंबईच्या डावात सूर्यकुमार यादवने 54 धावांची घणाघाती खेळी करत सुदर्शनला मागे टाकत 427 धावांसह ऑरेंज कॅपचा मान मिळवला. पण ही पॅप त्याच्या डोक्यावर चार तासही टिकली नाही. विराट कोहलीने 51 धावांची खेळी करत सूर्याला मागे टाकले आणि त्या कॅपवर आपले नाव लिहिले. विराटने तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतके ठोकली. या कामगिरीमुळे तो आयपीएलच्या टॉप फाईव्ह फलंदाजांमध्येही दाखल झाला; पण विराटच्या ऑरेंज कॅपचा आनंद साई सुदर्शनने 24 तासही राहू दिला नाही.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सुदर्शनने शुभमन गिलच्या साथीने 93 धावांची खणखणीत सलामी दिली. गेल्या 8 सामन्यांत 5 अर्धशतके झळकवणारा साई सहाव्या अर्धशतकाच्या उंबरठय़ावर होता; पण त्याची आजची खेळी 39 धावांवरच अडकली. मात्र त्याने 27 वी धाव काढत कोहलीच्या 447 धावांना मागे टाकले. आता तो 456 धावांसह पुन्हा नंबर वन ठरला आहे आणि त्याने ऑरेंज कॅपही काबीज केली आहे. मात्र आता त्याची कॅप पुढील तीन दिवस त्याच्या डोक्यावर स्थिर राहील. त्यानंतर 1 मे रोजी सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैसवाल, मग 4 मे रोजी निकोलस पूरन आणि मिच मार्श या फलंदाजांकडून काहीसा धोका आहे; पण त्याचबरोबर सुदर्शनला येत्या 2 मेला आपल्या धावांचा आकडा 500 पार नेत ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर आणखी घट्ट करण्याची संधी आहे. सुदर्शनच्या डोक्यावर कॅप स्थिरावली असली तरी ती फार काळ राहणार नाही. कारण सध्या 6 फलंदाज 400 पेक्षा अधिक धावांसह सुदर्शनच्या मागे आहेत.