
आरे वसाहत आणि मुंबईत इतर दोन ठिकाणी रस्ते काँक्रीटीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची केल्याप्रकरणी तीन कंत्राटदारांना 45 लाखांचा दंड केल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा निकृष्ट दर्जाची काँक्रीटीकरणाची कामे होत असल्याचे आढळले आहे. याप्रकरणी कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल वांद्रे पश्चिम येथील एका दुय्यम अभियंत्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावरही कारवाई करण्यात आली असून कंत्राटदाराला 50 लाखांचा तर गुणवत्ता देखरेख करणाऱ्या संस्थेला 25 लाखांचा दंड करण्यात आला आहे.
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू असून ते पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी सर्व अभियंत्यांना दिले आहेत, मात्र चांगल्या दर्जाची कामे करण्याऐवजी पुन्हा निकृष्ट दर्जाचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. पालिकेच्या एच-पश्चिम विभागात येणाऱ्या वांद्रे येथील एका रस्ते कामात ‘सब बेस लेयर’ म्हणून वापरल्या जाणाऱ्या ड्राय लीन काँक्रीट (डीएलसी) मिश्रणात गुणवत्तेचा अभाव आढळल्यामुळे कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवल्याप्रकरणी कंत्राटदाराला 50 लाखांचा तर गुणवत्ता नियंत्रण संस्थेला 25 लाखांचा दंड करण्यात आला आहे. दरम्यान, याआधी 16 एप्रिलला रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे केल्याप्रकरणी आरे वसाहतीमधील कंत्राटदाराला 5 लाखांचा तर इतर दोघा कंत्राटदारांना 40 लाखांचा दंड केला होता तसेच या कंत्राटदारांना दोन वर्षांसाठी निविदा भरण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पहिल्यांदा कारणे द्या नोटीस, नंतर कारवाई
पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतेच एच-पश्चिम विभागातील रस्ते कामांना भेट दिली. त्यावेळी ग्रेडेशन, मिक्स डिझाईन, कॉम्पक्शन आदी बाबतीत गुणवत्तेचा अभाव, उंच सखलता व असमानता आढळली. याची गंभीर दखल घेत, महापालिकेचे दुय्यम अभियंता, कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्था यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली. त्यामुळे अभियंता, कंत्राटदार आणि गुणवत्ता देखरेख करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्यात आली. गुणवत्ता देखरेख संस्थेला दंड करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
रस्ते काँक्रीटीकरण कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा अथवा त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. जिथे दोषपूर्ण प्रकार आढळतील तिथे सर्व संबंधित जबाबदार व्यक्ती अथवा संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला आहे.