
मुंबई महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या 80 टक्के नालेसफाईला एक महिना उशिराने सुरुवात झाल्यानंतरही नालेसफाईची रखडपट्टी सुरूच आहे. त्यात आता नालेसफाईच्या टक्केवारीबाबत पालिकेकडून केले जाणारे दावे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. मुंबई महापालिकेने आतापर्यंत 43 टक्के नालेसफाई झाल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या डॅशबोर्डवर आतापर्यंत केवळ 32 टक्के नालेसफाई झाल्याचे आकडे दाखवत आहे. पावसाळा सुरू व्हायला केवळ एक महिना शिल्लक असताना 100 टक्के नालेसफाई अशक्य आहे. त्यामुळे मुंबईकर तसेच लोकप्रतिनिधी यांच्या रोषाला बळी पडू नये, यासाठी पालिकेकडून नालेसफाईचे खोटे दावे केले जात असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत पावसाळय़ापूर्वी 80 टक्के, पावसाळय़ात 10 टक्के आणि पावसाळा संपल्यावर 10 टक्के अशा तीन टप्प्यांत छोटय़ा आणि मोठय़ा नाल्यांतील गाळ काढण्यात येतो. मुंबई महापालिकेने 23 कंत्राटदारांकडे नालेसफाई आणि मिठी नदी व इतर नदी पात्रांतील गाळ काढण्याची कंत्राटी कामे दिली आहेत. त्यासाठी पालिका तब्बल 395 कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा अथवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी पालिकेने कडक अटी-शर्ती आणि नियम लागू केले आहेत. कंत्राटदारांना नालेसफाई काम सुरू करण्यापूर्वी आणि नालेसफाई कामानंतर पह्टो आणि व्हिडिओ शूटिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संबंधित अभियंत्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामावर कडक देखरेख असतानाही नालेसफाईची कामे मात्र अत्यंत धिम्या गतीने सुरू आहेत.
30 दिवसांत 48 टक्के नालेसफाई कशी पूर्ण करणार?
मुंबईतील पावसाळय़ापूर्वीची नालेसफाई 31 मेपर्यंत 100 टक्के पूर्ण करा, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात नालेसफाईला सुरुवात झाली आहे. मात्र नालेसफाई कासवगतीने सुरू असून 100 टक्के नालेसफाईला केवळ 30 दिवस शिल्लक आहेत. असे असताना पालिका ही नालेसफाई कशीकाय पूर्ण करणार आहे, असा सवाल सर्वसामान्य मुंबईकर विचारत आहेत.
1 मेपर्यंतचा नालेसफाईचा डॅशबोर्ड
मुंबई शहर 36.05 टक्के
पूर्व उपनगर 54.44 टक्के
पश्चिम उपनगर 48.56 टक्के
मिठी नदी 24.93 टक्के
छोटे नाले 20.85 टक्के
एकूण नालेसफाई 32.44 टक्के