जोगेश्वरी, गोरेगावमधील नालेसफाईला वेग द्या! शिवसेनेची मागणी

जोगेश्वरी आणि गोरेगाव पूर्वमधील वडार पाडा ते आरे भास्कर तसेच वालभट नदीमधील नालेसफाई आणि गाळ उपसा अजूनही झालेला नाही. या भागांतील नालेसफाईची कामे केवळ 25 टक्केच पूर्ण झाली आहेत. पावसाळय़ाला आता केवळ एक महिना शिल्लक राहिला असून जोगेश्वरी, गोरेगाव पूर्वमधील नालेसफाईला वेग द्या, असे आदेश जोगेश्वरीचे आमदार बाळा नर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

जोगेश्वरी विधानसभेचे आमदार अनंत (बाळा) नर यांच्या उपस्थितीत तसेच पी/दक्षिण विभाग कार्यालयातील पर्जन्यजल वाहिनी खात्यातील अधिकाऱ्यांसह वार्ड क्रमांक 52 आणि 53 विभागातील पावसाळय़ापूर्वीच्या नालेसफाईची पाहणी करण्यात आली. वडारपाडा, आरे भास्कर क्रीडा संकुल, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व) येथील नाल्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी विभाग संघटक शालिनी सावंत, विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, महिला विधानसभा समन्वयक सुगंधा शेट्टे, उपविभागप्रमुख जितेंद्र वाळवी, शाखाप्रमुख संदीप गाढवे, विलास तावडे, विधानसभा व्यापार विभाग अध्यक्ष संजय सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.