
>> स्पायडरमॅन
आजही शेतीला कष्ट हे लागतातच, पण पूर्वीपेक्षा त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. ठिबक सिंचन, युरिया, पाण्याचे पंप, नांगरणी, फवारणीची आधुनिक यंत्रे, मळणीची यंत्रे, ट्रक्टर यांसारखी अनेक शेतकरी उपयोगी यंत्रे शेतीला सहाय्यक बनली. आजकाल तर काही शेतकरी ड्रोनचा वापरदेखील करू लागले आहेत. त्यात ट्रक्टर हा तर शेतकऱयाचा सर्वात जवळचा मित्र बनला आहे, पण आजच्या काळातदेखील असे गाव तुम्हाला माहीत आहे का, जिथे पहिल्यांदा ट्रक्टर पोहोचला आहे? राजस्थानच्या सिरोहीमधील माऊंट अबूच्या दुर्गम जंगलात वसलेल्या एका गावात पहिल्यांदा ट्रक्टर पोहोचला आणि लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माऊंट अबूच्या दुर्गम भागात समुद्र सपाटीपासून 5000 फुटांवर वसलेले उतरज या गावात जाण्यासाठी साधा रस्तादेखील नाही. गुरू नावाच्या शिखरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात जाण्यासाठी अत्यंत उबडधाबड आणि पायऱ्यांसारखा एक कच्चा रस्ता आहे. अशा दुर्गम गावात आजवर शेती ही पारंपरिक पद्धतीने आणि बैलांच्या मदतीने होत असे. अत्यंत कष्ट करत धान्य उगवणाऱया गावकऱयांनी एक दिवस निर्धार केला आणि गावात ट्रक्टर आणण्याचे स्वप्न पाहिले. गावकऱयांनी अबू रोडवर असलेल्या महिंद्रा ट्रक्टर डीलरशी संपर्क साधला. गावकऱयांच्या इच्छाशक्तीला त्याचीदेखील मदत मिळाली. नव्या ट्रक्टरचे सर्व पार्ट वेगवेगळे करण्यात आले आणि गुरू शिखरापर्यंत दुसऱया ट्रक्टरने पोहोचवण्यात आले. तिथून गावकरी लोक ते खांद्यावर घेऊन सात तास चालत आपल्या गावी पोहोचले. तिथे एक तात्पुरता वर्कशॉप उभारून इंजिनीअर्सनी पुन्हा ते सर्व पार्ट जोडले आणि गावाने पहिल्यांदा ट्रक्टरची घर्रघर्र ऐकली. उतरज गावासाठी ही नव्या युगाची सुरुवात म्हणायला हवी.