सिनेविश्व – मल्टिप्लेक्सच्या झगमगाटात सिंगल स्क्रीन हवीत

>> दिलीप ठाकूर

आजच्या चित्रपटसृष्टीसमोरच्या अनेक आव्हानातील एक म्हणजे, सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स ओटीटी अशा तिन्ही माध्यमांतील रसिकांना आवडेल असा चित्रपट पडद्यावर आणणे. एकाच वेळेस विविध माध्यमांतून रसिकांसमोर पोहोचणारा चित्रपट निर्माण करताना एक सूत्र लोकप्रिय ठरू शकते. ते म्हणजे, दर्जेदार गीतसंगीत नृत्य.

पिक्चर पाहताना मनमुराद टाळ्या आणि शिट्टय़ांनी पडद्यावरील संवाद वा हिरोच्या एण्ट्रीला दाद देत थिएटर डोक्यावर घ्यायची परंपरा सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहाची! चित्रपटात मन रमले, न रमले तरी गुबगुबीत व आलिशान खुर्चीत बसण्याचा आणि उच्च दर्जाची श्रवण यंत्रणा (सुपर साऊंड सिस्टीम) अनुभव घ्यायचा तर मल्टिप्लेक्समध्ये जायचे असे जणू समीकरण झाले आहे. बरं, अगदी नवीन मल्टिप्लेक्स स्क्रीन तर अतिशय आधुनिक (फोर डी वगैरे. सगळे कसे टेक्नोसॅव्ही ) आहेत. बोरीवली पूर्वला, पुण्यात हिंजवडीत आणि गुजरातमधील भरोच येथील नवीन मल्टिप्लेक्सची भर पडली आहे. ती हाऊसफुल्ल गर्दीत चालू देत अशी सदिच्छा. मल्टिप्लेक्स म्हणजे एक वेळ चित्रपट पाहण्यासारखा नसला तरी चालेल, पण महागडय़ा तिकिटात अडीच तासांची चेअर नक्कीच सुखावह आहे. अरे, पण आम्हाला चांगले कथासूत्र असणारे चित्रपट हवेत!

आपल्या देशात मूकपटापासून ब्लॅक आण्ड व्हाइट अर्थात कृष्ण धवल काळासह चित्रपट रुजवला, वाढवला, पसरला तो सिंगल स्क्रीन थिएटर्सनी.  पिक्चर पाहताना सेन्सॉर प्रमाणपत्रावर अठरा अथवा वीस-बावीस रिळ वाचल्यावर नेहमीच्या तिकीटात जास्त लांबीचा पिक्चर एन्जॉय करायला मिळणार या भावनेने गर्दीतून हमखास एखादी शिट्टी यायचीच. पूर्वी मोठ्या शहरातील चित्रपट छोट्या शहरात आणि मग ग्रामीण भागातील टूरिंग टॉकीज, तंबू थिएटर्स, छप्पर नसलेले ओपन थिएटर (चारही बाजूने झावळी वा पत्रे लावलेले) येथे पोहोचायला किमान दीड-दोन वर्षे सहज लागायची. म्हणून तर गावाकडचा नातेवाईक वा पाहुणा मुंबई पाहायला आला की त्याला पिक्चर दाखवायची सामाजिक सांस्कृतिक परंपरा होती. ही मंडळी गावाला पोहोचली की पारावरच्या गप्पांत ‘मुंबईला गेलो होतो, मिनर्व्हात शोले पाहून आलो. काय सांगू?’ याचे रसभरित वर्णन करत भाव खायचे. आजच्या डिजिटल युगात एकाच वेळेस एकाच शुक्रवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होत असल्याने आपल्या छोट्या शहरात पिक्चर कधी येणार याची वाट पाहण्याची उत्सुकता संपली आहे.

सिंगल स्क्रीन थिएटर्सला तिकीट दरापासून प्रेक्षक चित्रपटाशी जोडला जाई. आवडलेला प्रत्येक चित्रपट त्या काळात पुनः पुन्हा पाहण्याची आणि त्यावर भरभरून बोलण्याची सवय नि आवड होती. मल्टिप्लेक्स युगात याचसाठी सिंगल स्क्रीन जगावीत असे वाटते. कारण त्यात मोकळेढाकळे वातावरण असते. चांगल्या विनोदावर मोकळेपणाने हसता येते. मध्यंतराला पॉपकॉर्न, समोसा, शीतपेये न घेताही लॉबी कार्डसवर नजर टाकता येते. त्यानेही भूक भागते. त्यात अनेक पिढय़ांनी आनंद घेतला.

आजच्या चित्रपटसृष्टीसमोरच्या अनेक आव्हानातील एक म्हणजे, सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स व ओटीटी अशा तीनही माध्यमांतील रसिकांना आवडेल असा चित्रपट पडद्यावर आणणे. सिंगल स्क्रीन हे बाहेरचे जग व हातातील मोबाईल विसरायला लावते. मल्टिप्लेक्स कार पार्किंग व शो संपल्यावरच्या रेस्टॉरंटच्या विचारात चित्रपट पाहायला लावते तर ओटीटीवरचा पिक्चर आवडला नाही तर फास्ट फॉरवर्ड करून बाहेरून मागवलेल्या जेवणाने रंगत आणते. चित्रपट पाहणे आणि खाणे हेदेखील एक विशेष.

आज मात्र एकाच वेळेस विविध माध्यमांतून रसिकांसमोर पोहोचणारा चित्रपट निर्माण करणे आव्हानात्मक आहे. तीनही माध्यमांतून दर्जेदार गीत-संगीत व नृत्य हे सूत्र लोकप्रिय आहे. आपल्या चित्रपट संस्कृतीतील गीत-संगीत-नृत्य हा कायमच एका पिढीतला चित्रपट पुढील अनेक पिढय़ांपर्यंत नेणारा ठरला आहे. सिंगल स्क्रीन असो, मल्टिप्लेक्स असो वा ओटीटी, सगळीकडेच गुंतवून ठेवणारी आहेत…

[email protected]

(लेखक सिनेपत्रकार समीक्षक आहेत)