
जम्मू-काश्मीरात पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 निरापराध पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात चहूबाजूने काsंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सिंधु जलकरार स्थगित करून पाणीकोंडी केल्यानंतर आता पाकिस्तानातून आयात होणाऱया सर्व वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच टपाल आणि पार्सल सेवाही बंद केली आहे. यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी होणार आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. पाकिस्तानमधून येणाऱया कोणत्याही वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानमधून आयात होणारी वस्तू इतर कोणत्याही देशामार्गे हिंदुस्थानात आयात करता येणार नाही. या निर्णयातील कोणत्याही अपवादासाठी केंद्र सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
पाकिस्तानमधून हवाई मार्गे आणि रस्ते मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारची टपाल आणि पार्सल सेवा तत्काळ बंद करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानातून होणारे दळणवळण थांबल्याने संपर्कच तोडण्यात आला आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी खड्डय़ात
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सुरूवातीला सिंधु जलकरार स्थगित केला. वाघा-अटारी सीमा बंद केली. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. व्हिसा रद्द केला. आता आयात बंदी, टपाल सेवा बंदीसारखे निर्णय घेऊन पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आलेली आहे. आता अर्थव्यवस्था आणखी खड्डय़ात जाणार आहे.
दहशतवादी चेन्नईहून श्रीलंकेला गेल्याचा संशय
पहलगाम हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी चेन्नईहून श्रीलंकेला पळून गेल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याबाबत श्रीलंका सरकारशी संपर्क साधण्यात आला आहे. आज श्रीलंका एअरलाईन्सने निवेदन जारी केले आहे. श्रीलंका एअरलाईनचे विमान सकाळी 11.59 वाजता चेन्नईहून कोलंबोच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यात दहशतवादी असल्याचे समजल्यावर सुरक्षा अधिकाऱयांनी विमानाची कसून झडती घेतली, असे श्रीलंका एअरलाईन्सने म्हटले आहे.
‘अब्दाली’ची चाचणी
हिंदुस्थानने कठोर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर पाकिस्तान आणखी बिथरला असून आज अब्दाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची घाईघाईत चाचणी करण्यात आली. 450 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. अब्दाली वेपन सिस्टिम म्हणून ओळखल्या जाणाऱया या क्षेपणास्त्राची चाचणी ‘एक्सरसाईज इंडस’ या सैन्य सरावाअंतर्गत करण्यात आली. जाणूनबुजून हे शक्ती प्रदर्शन केल्याचे मानले जात आहे.