विजेतेपदाच्या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र सज्ज, महाराष्ट्र-हरयाणामध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई

खेलो इंडिया युथ गेम्सच्या सातव्या पर्वात सर्वसाधारण विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. यंदाही महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा अशीच वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. रविवारी तिरंदाजीच्या कम्पाऊंडमधील रँकिंग राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी अव्वल स्थानावर झेप घेत स्पर्धेत दमदार प्रारंभ केला.

स्पर्धेतील 27 पैकी 26 क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राचा बलाढय़ संघ मैदानात उतरला आहे. 437 खेळाडूंसह 128 प्रशिक्षक, व्यवस्थापक असे एकूण 565 जणांचे पथक बिहारच्या स्वारीमध्ये सहभागी होणार आहे. महिला खेळाडूंची संख्या सर्वाधिक 238 असून, 177 मुले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यामध्ये 44 खेळाडूंचा सर्वाधिक मोठा संघ हा जलतरणाचा आहे. गतवेळी जलतरणात महाराष्ट्राने 27 पदकांची लयलूट केली होती. यंदाही स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राचा सुवर्णदिन पाहण्यास मिळणार आहे. दिल्लीत 10 मेपासून होणाऱया जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारातही महाराष्ट्राचा बोलबाला असणार आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दृश्राव्य प्रणालीद्वारे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

हॅटट्रिकसह विक्रमी पाचव्या विजेतेपदासाठी मराठमोळे क्रीडापटू उद्घाटनाच्या दिवसापासून झुंज देत आहेत. भागलपूर येथील आर्चरी रेंजवर गतविजेत्या महाराष्ट्राने खेलो इंडिया युथ गेम्सच्या सातव्या पर्वाचीही आपल्या लौकिकास साजेशी सुरुवात केली. बुलढाण्याच्या तेजल साळवे हिने तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात सर्वाधिक 697 गुणांचा वेध घेत रँकिंग राऊंडमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले. पाठोपाठ वैदेही जाधवने 692 गुणांची कमाई करीत दुसरा, तर प्रीतिका हिने 690 गुणांसह तिसरा क्रमांक निश्चित केला. मुलांच्या रिकर्व प्रकारात महाराष्ट्राच्या ज्ञानेश चेराळेने 651 गुणांसह तिसरे स्थान संपादून पदकाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.

जलतरण, जिम्नॅस्टिक्स व ऍथलेटिक्समध्ये महाराष्ट्र पदकांच्या शर्यतीत पहिल्या दिवसापासून पदकतक्त्यात आघाडीवर असणार आहे. कुस्ती, मुष्टियुद्ध खेळात हरियाणी घोडदौड दिसेल. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र-हरियाणा यांच्यात कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील. उत्तराखंडातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू पार्थ माने, शांभवी क्षीरसागर आर्चरीचे प्रीतिका प्रदीप, वैष्णवी पवार हे वरिष्ठ गटातील पदकवीर युवा खेलो इंडियात सोनरी यशासाठी आतूर झाले आहेत.

2018 पासून दिल्ली येथून खेलो इंडिया स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले होते. 2019 साली पुणे , 2020 साली आसाम स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2022 साली मध्य प्रदेशमधील स्पर्धेत विजेतेपद महाराष्ट्राने खेचून आणले. गतवर्षी 2023 मध्ये तामीळनाडूत महाराष्ट्र पुन्हा चॅम्पियन ठरला. गतवेळी तामीळनाडू येथील खेलो इंडिया स्पर्धेत 57 सुवर्ण, 48 रौप्य व 53 कांस्य, अशी एकूण 158 पदकांची लयलूट करून महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. आता बिहार स्पर्धेत विजेतेपदाच्या हॅटट्रिकची महाराष्ट्राला मोठी संधी असेल. आतापर्यंत झालेल्या सहा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने चार वेळा, तर हरियाणाने दोन वेळा या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे. गतविजेता महाराष्ट्र व हरियाणा या दोन तुल्यबळ संघांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई असेल. यावेळीही महाराष्ट्राकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे.