
सिल्लोड फौजदारी तथा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश के. टी. अढायके यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना तगडा झटका दिला. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात दाखल फौजदारी याचिका दर आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सुनावणी घेण्यात येईल, असे आदेश दिले. त्यामुळे सदर प्रकरण आता फास्ट ट्रकवर चालणार आहे.
सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका क्रमांक 461/2023 दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी 2014 व सन 2019 साली सिल्लोड सोयगाव विधानसभा 104 निवडणूक लढवताना नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेले शपथबद्ध शपथपत्र यामध्ये खोटे व भ्रामक माहिती दिली आहे. शपथपत्रात त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन, वाणिज्य व निवासी मालमत्ता यांचे खरेदी मूल्य वेगवेगळे दाखवले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी दोघांच्या नावे असलेले ऋणपत्र, बंधपत्र, कंपन्या शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादी मधील युनिटचा तपशील दिलेला नाही. स्वत:ची शैक्षणिक माहिती चुकीची दिली.
याचिकेत न्यायालयामार्फत तब्बल तीन वेळा पोलीस तपास करून अहवाल मागविण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार 11 जुलै 2023 रोजी तत्कालीन न्यायाधीश मीनाक्षी एम. धनराज यांनी प्रकरणात गुन्हा नोंदवून त्यात न्यायालयीन खटला सुरू करण्याचे आदेश दिले होते.
प्रकरणात काल फिर्यादी शंकरपेल्ली यांची अब्दुल सत्तार यांच्या विधिज्ञमार्फत उलट तपासणी घेण्यात येणार होती, परंतु न्यायालयाने शेवटची संधी दिल्यानंतरही त्यांचे विधिज्ञ नीलेश घाणेकर हे तारखेला उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने शंकरपेल्ली यांच्या अर्जानुसार आता फिर्यादीचे विधिज्ञ यांना शंकरपेल्ली यांची उलट तपासणी घेता येणार नाही असा आदेश दिला. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्या प्रकरणात दैनंदिन म्हणजे रोजच्या रोज सुनावणी घेण्यात यावी, या निर्देशानुसार अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणात आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सुनावणी घेण्यात येईल असे आदेश दिले. त्यामुळे सदर प्रकरण आता फास्ट ट्रकवर चालणार आहे.
आदेशामुळे महेश शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक हरदास यांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर प्रकरण आता फास्ट ट्रकवर चालणार असल्यामुळे लवकरच प्रकरणात न्यायालयामार्फत निर्णय दिला जाईल व आम्हाला न्याय मिळेल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.