भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटही फोडणार, फोडाफोडी हीच त्यांची भूमिका – संजय राऊत

इतर पक्ष फोडा आणि स्वतःचा पक्ष वाढवा, अशी वक्तव्ये करणाऱ्यांना जनता गांभीर्याने घेत नाही. त्यांना स्वप्नातही पक्ष फोडाफोडीच दिसते, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला. तसेच भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटही फोडणार आहे, हीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळे भाजपसोबत असताना अजित पवार कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांकडे जनता गांभीर्याने बघत नाही. शिवसेना फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, काँग्रेस फोडा, आता ते एकनाथ शिंदे यांची शिंदे गटही फोडणार आहेत. तसेच ते अजित पवार यांचा गटही फोडणार आहेत. मुघलांना स्वप्नात संताजी, धनाची दिसायचे , तसे यांना आता स्वप्नात फक्त फोडाफोडी दिसते. अजित पवार यांना शरद पवार राजकीयदृष्ट्या माफ करणार नाहीत. अमित शहा यांनी ज्यापद्धतीने अजित पवार यांना हाताशी धरून पक्ष फोडला, ही काय महान विचारधारा वैगरे नाही. ते घाबरून पळून गेलेले लोकं आहेत. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजपसोबत असताना ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना त्यांचा गट भाजपमध्ये विलीन करावा लागेल. त्यानंतर त्यांना भविष्यात भाजपचे म्हणून ही संधी मिळून शकते, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

शरद पवार यांची रविवारी आपण भेट घेतली. नरकातल स्वर्ग या आपल्या पुस्तकाचे 17 मे रोजी प्रकाशन होणार आहे. त्या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे आहेत. त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती, ती आपण दिली आणि त्यावर चर्चा झाली. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि कश्मीरमधील नरसंहार याला केंद्रीय गृहमंत्री अमिश शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणीवर ठाम आहोत. संकटकाळात सरकारला पाठिंबा देणे म्हणजे नरसंहाराला जबाबदार असलेल्यांना पाठिंबा देणे असे होत नाही, हे आपले मत असून ते स्पष्टपणे त्यांना सांगितले आहे.संकटकाळात सरकारसोबत राहिले पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. मात्र, हे सरकार पाठिंबा देण्याच्या लायकीचे नाही. हे बदमाशांचे सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटाही दिसत नाही.अशा लोकांना पाठिंबा देणं म्हणजे देशाशी बेइमानी करण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.

संसदेत कश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली तर आम्ही संसेदत अमित शहा यांचा राजीनामा मागणार आहोत. काँग्रेस पक्षाकडून झालेल्या चुकांबाबत काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी माफी मागितली आहे. चुकांची माफी मागण्याचा मोठेपणा राहुल गांधी यांनी दाखवला आहे. त्यांच्याकडून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शकण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. स्वतःच्या चुका मोकळेपणाने स्विकारणे, ही लोकशाही आहे, हे मोदी, शहा यांनी शिकले पाहिजे.