कॉमेडियन समय रैनासह इतर चौघांना सुप्रीम कोर्टाचे समन्स; दिव्यांग व्यक्तींबाबत असंवेदनशील वक्तव्य भोवणार

दिव्यांग व्यक्तींबाबत कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉमेडियन समय रैनासह अन्य चौघांना समन्स बजावले. पाचही जणांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तसेच त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली.

पुढील सुनावणीच्या दिवशी रैना, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठाकर उर्फ सोनाली आदित्य देसाई आणि निशांत जगदशीश तंवर यांना समन्स बजावण्यात आले आहेत.

पुढील सुनावणीवेळी उपस्थित न राहिल्यास कठोर पावले उचलली जातील, असे न्यायालयाने बजावले. “द्वेषयुक्त भाषण, इतरांना कमी लेखण्यासाठी केलेले कोणतेही भाषण अशा प्रकारचे स्वातंत्र्य जर असेल तर आम्ही ते काढून घेऊ” असे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले.

मेसर्स क्युअर एसएमए फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. या याचिकेत दिव्यांग व्यक्तींबाबत डिजिटल मीडियावर अपमानास्पद आणि संवेदनशील कंटेंट प्रसारित करण्यावर बंदी घालावी. तसेच, ऑनलाइन कंटेंट प्रसारित करण्यासंदर्भात दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले.