आनंदाची बातमी! एसबीआय 18 हजार जागा भरणार

बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) 2025-26 मध्ये जवळपास 18 हजार पदे भरणार आहे. या पदांमध्ये 13 हजार 500 ते 14 हजार पदे ही कारकून (क्लर्क) ची, तर 3 हजार पदे ही अधिकारी पदांची असतील, असे बँकेचे अध्यक्ष सीएस शेट्टी यांनी सांगितले. आर्थिक 2024-25 च्या चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

गेल्या दशकभरानंतर स्टेट बँकेत सर्वात मोठी भरती केली जात आहे. आम्ही आमच्या टेक्नोलॉजी स्तराला नव्या स्तरांवर घेऊन जाणार आहोत. त्यामुळे या भरतीत 1600 पदे ही सिस्टम अधिकाऱ्यांची भरली जाणार आहेत, असेही शेट्टी यांनी सांगितले. बँकेतील ही भरती नव्या बँकिंगसाठी उचललेले पाऊल आहे. टेक्नोलॉजीसाठी किती गुंतवणूक केली जाईल याची माहिती सांगितली नसली तरी एसबीआय बँक टेक्नोलॉजीसाठी पैसे कमी पडू देणार नाही, असे ते म्हणाले. एसबीआयने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एक लाख कोटी रुपयांहून अधिक नफा मिळवला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा नफा 17.89 टक्के अधिक आहे. बँकेतील ठेवीची रक्कम 53 लाख कोटींच्या पुढे गेली आहे, असेही शेट्टी यांनी या वेळी सांगितले.