
वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता 15 मे रोजी नवे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून सुनावणी घेतली जाईल.
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना 13 मे रोजी पदभार सोडणार आहेत. या टप्प्यावर सुनावणी सुरू केली तर ती लवकर पूर्ण करावी लागेल. या परिस्थितीत कोणताही आदेश वा निर्णय राखून ठेवू इच्छित नाही, असे सांगत सुनावणी घेण्यास न्या. खन्ना यांनी नकार दिला आणि हे प्रकरण सुनावणीकरिता न्या. गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर ठेवले. न्या. खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर वक्फची सुनावणी सुरू होती.
केंद्र सरकारने वक्फ प्रकरणी सादर केलेले प्रतिज्ञापत्र आपण पूर्ण वाचलेले नाही. सरकारने वक्फ मालमत्तांच्या नोंदणीबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत आणि आकडेवारीही दिली आहे. या सगळ्य़ावर सखोल विचार व्हायला हवा, असे सरन्यायाधीश म्हणाले.
तत्पूर्वी केंद्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अप्रत्यक्षपणे सरन्यायाधीशांच्या निवृत्तीचा उल्लेख केला. त्यावर न्या. खन्ना यांनी ही बाब स्पष्ट केली. आपल्या निवृत्तीची आठवण करून देताना वेदना होत असल्याचे मेहता म्हणाले. त्यावर वाईट वाटण्याचे कारण नाही. मी याची वाटच पाहत आहे, असे उत्तर सरन्यायाधीशांनी दिले.