
पराभवाच्या छायेत असलेल्या मुंबईला आज पाऊस पावला. पावसानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केले आणि सामन्यात चुरस निर्माण झाली. दरम्यान शेवटची दोन षटके बाकी असताना पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने सामना थांबला. मुंबई 5 धावांनी पुढे आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत सामन्याचा निकाल लागला नाही.
मुंबईला आजच्या महत्त्वपूर्ण सामन्यात रायन रिकल्टन आणि रोहित शर्माकडून जोरदार सलामीची अपेक्षा होती; पण मुंबईच्या विजयी षटकारात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या शर्मा आणि रिकल्टनने निराशा केली. रिकल्टन अवघ्या 2 धावांवर असताना मोहम्मद सिराजने त्याची विकेट काढून मुंबईला जोरदार धक्का दिला. मग हिटमॅन रोहितकडून आणखी एका दमदार खेळीची क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा होती, पण त्याच्याही बॅटला सूर सापडला नाही. रोहितसुद्धा 8 चेंडूंत 7 धावा करून माघारी परतला आणि मुंबईची 2 बाद 26 अशी अवस्था झाली.
जॅक्स आणि सूर्याने सावरले
सलामीवीरांनी निराशा केल्यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादवने मुंबईच्या डावाला आधार दिला. सूर्याची बॅट आजही तळपली. मात्र आज त्याच्या डावात एकाही षटकाराचा समावेश नव्हता. तरीही त्याने पाच चौकारांसह 35 धावा काढताना 71 धावांची वेगवान भागी रचली.
मधल्या फळीने माती खाल्ली
जॅक्स आणि सूर्याने मुंबईच्या धावसंख्येला गती दिली होती. मात्र सूर्या बाद झाल्यावर तिलक वर्मा (7), हार्दिक पंड्या (1), नमन धीर (7) यांनी अपयशाची माती खाल्ल्यामुळे मुंबईचा डाव गडगडला. जॅक्सचा झंझावातही 35 चेंडूंत 3 षटकार आणि 5 चौकार ठोकून 53 धावांवर शांत झाला. या अपयशांमुळे मुंबईने 6 षटकांत केवळ 26 धावाच केल्या आणि 5 विकेटही गमावल्या, मग बॉशने 27 धावांची उपयुक्त खेळी साकारत मुंबईला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. पहिल्या दहा षटकांत 2 बाद 89 धावा करणाऱया मुंबईने दुसऱया दहा षटकांत 5 विकेट गमावत 66 धावा केल्या.