पाकिस्तानी सैन्यावर बलुच बंडखोरांचा 24 तासात दुसरा मोठा हल्ला, IED स्फोटात 14 सैनिक ठार झाल्याचा दावा

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. एकीकडे हिंदुस्थानने नाक दाबून बुक्क्यांचा मारा सुरू केला असताना दुसरीकडे बलुचिस्तानमधील बंडखोरांनीही पाकिस्तानी सैन्यावर हल्ले सुरू केले आहेत. बलुच लिबरेशन आर्मीने गेल्या 24 तासात पाकिस्तानी सैन्यावर दुसरा मोठा हल्ला केला आहे. यात 14 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा बलुच बंडखोरांनी केला आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने बोलानमधील माछकुंड भागात पाकिस्तानी सैन्याच्या वाहनाला लक्ष्य केले. बीएलएच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने पाकिस्तानी सैन्याचे वाहन रिमोट वापरून आयईडी स्फोटाने उडवले. यात 14 सैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी सैन्य मिलिटरी ऑपरेशनची तयारी करत असताना बलुच बंडखोरांनी हा हल्ला केला. याआधीही बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले केले आहेत. यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले.