
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये गेले तीन-चार दिवस सुरू असलेल्या चकमकीचे स्वरूप पाहता, हे अण्वस्त्रधारी देशांमधील ड्रोन वॉर ठरेल. जागतिक प्रसारमाध्यमांच्या मते, हे जगातील पहिले ड्रोन वॉर आहे. काही अभ्यासकांच्या मते, ही तीव्र हवाई हल्ल्यांकरिता मार्ग मोकळा करण्याची नीती आहे, तर काहीजण ही प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटू नये म्हणून वापरलेली संयमी स्ट्रटेजी आहे, असे मानतात. आज झालेल्या युद्धविरामामुळे ही नीती कामी आल्याचे दिसून येत आहे.
ड्रोनची पाडापाडी
भारताने गुरुवारी पाकिस्तानवर कश्मीरमधील तीन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रs डागल्याचा आरोप केला. तर पाकिस्तानने कराची आणि लाहोरजवळ भारताचे इस्रायली बनावटीचे 25 ड्रोन पाडल्याचा दावा केला. भारताने यात पाकिस्तानच्या हवाई संरक्षण रडारना लक्ष्य केल्याचे स्पष्ट केले. तर शुक्रवारी पाकने 300 ते 400 तब्बल ड्रोन डागल्याचा दावा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी केला. या स्वरूपाचे ड्रोन वॉर हे युद्धनीतीचा नवा आविष्कार ठरेल.
ड्रोन कशासाठी?
लेसर दिशादर्शित क्षेपणास्त्र आणिबॉम्ब, ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांनी (यूएव्ही) युद्धाचे स्वरूप अत्याधुनिक झाले आहे. लष्करी ऑपरेशन्सची अचूकता आणि कार्यक्षमता यामुळे वाढते. हवाई हल्ल्यांसाठी यांची मदत होते. लेसरने थेट लक्ष्य निश्चित करता येते. ड्रोनमुळे शत्रूची रडारसारखी हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करता येते, हे पाकिस्तानवरील भारताच्या हल्ल्यात दिसून आले.
पाकिस्तानकडे तुर्की-चिनी ड्रोन
भारताच्या ड्रोन ताफ्याला टक्कर देण्यासाठी पाकने चिनी सीएच-4, तुर्की बायरक्तार अकिन्सी या चीन, तुर्की ड्रोनबरोबरच स्वतःचे बुर्राक आणि शाहपर ड्रोन आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत. या ड्रोनला पूरक अशी हल्ला करणारी शस्त्रही पाककडे आहेत. दहा वर्षे पाकिस्तान आपला ड्रोन ताफा सज्ज करत आहे.
अमेरिकेचे प्रभावी प्रीडेटर लवकरच ताफ्यात
हल्लीच भारताने अमेरिकेकडून 4 अब्ज डॉलर्सचा 31 एमक्यू-9बी हे प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्यासाठी करार केला आहे. इस्रायली ड्रोनपेक्षाही प्रभावी असलेले हे ड्रोन 40 तास आणि 40 हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतात. यामुळे हल्ल्यांची क्षमता वाढणार आहे. या शिवाय भारतात झुंडीने हल्ला करणारे म्हणजे स्व्यार्म ड्रोन प्रणाली विकसित करत आहे.
भारताच्या अवकाशातील इस्रायली डोळे
हिंदुस्थानच्या ड्रोन ताफ्यातील इस्रायली आयएआय सर्चर आणि हेरॉनसारखे यूएव्ही तर भारताच्या अवकाशातील हे इस्रायली डोळे ठरले आहे. हार्पी आणि हार्प क्षेपणास्त्रs त्याला पूरक ठरतात. हेरॉन हे शांतता काळातील देखरेख आणि लढाऊ ऑपरेशन्स दोन्हीसाठी भारताच्या उपयोगी ठरले आहेत. या ताफ्यातील आयएआय सर्चर एमके टू तर 18 तासांपर्यंत 300 किमी आणि 23,000 फूट इतका पल्ला गाठते.
हे ड्रोन युद्ध वेगळे
युव्रेन-रशिया युद्धात या तंत्राचा वापर झाला. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील ड्रोनपेंद्रीय वॉर त्यापेक्षा वेगळे आणि अधिक व्यापक आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. ड्रोन लष्करी कारवायांमध्ये पेंद्रस्थानी बनले आहे. दोन्ही बाजूंनी पाळत ठेवण्यासाठी, लक्ष्य करण्यासाठी आणि थेट हल्ल्यांसाठी हजारो यूएव्ही तैनात केले जातात. यात लढाऊ विमाने किंवा जड क्षेपणास्त्रांऐवजी ड्रोनना प्राथमिक पर्याय म्हणून वापर होत आहे. विमानांपेक्षा ड्रोनमध्ये हलक्या शस्त्रास्त्रांचा वापर होतो. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटू नये म्हणून टाकलेले ही संयमी स्ट्रटेजी समजली जाते. मात्र आपल्या हवाई हल्ल्यांना मार्ग साफ करण्याकरिता भारताने ड्रोन स्ट्रटेजीचा वापर केला असेल तर युद्धाचे गणित पूर्णपणे बदलून जाते.